नागपूर : कोरोना संक्रमण वाढत असल्याने दु:खाची छटा सर्वांच्या चेहऱ्यावर पसरलेली आहे. पण याच दिवसात ईद आनंद घेऊन आली आहे. आर्थिक चणचण, मानसिक तणाव असला तरी, ईदच्या उत्साहामुळे चेहऱ्यावर आनंद पसरलेला दिसत आहे. महिनाभर रोजे ठेवणाऱ्यांसाठी हे पर्व म्हणजे अल्लाहकडून मिळालेल्या आनंदात सहभागी होण्याचा दिवस आहे.
शुक्रवारी ईद-उल्-फित्र साजरी होत आहे. कोरोना संक्रमणामुळे सरकारच्या आदेशानुसार प्रार्थनास्थळे बंद आहेत. हे पर्व लक्षात घेता, चार लोकांच्या उपस्थितीत ईद-उल्-फित्रची नमाज अदा करण्यासाठी परवानगी आहे. या नियमाचे पालन करून शहरातील २६५ पेक्षा अधिक मशिदींमध्ये ईदची नमाज अदा करून परंपरेचे पालन केले जाईल, तर मुस्लिम बांधव घरूनच नमाज अदा करतील.
कोरोना संक्रमण पसरू नये, यासाठी धर्मगुरूंनी घरातूनच नमाज अदा करण्याचे आवाहन केले आहेत. मास्क, सॅनिटायझरचा उपयोग करावा, सुरक्षित अंतर राखावे, गर्दी टाळावी, असे आवाहन केले आहे. आर्थिक अडचणीत असलेल्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार, अनेकजण मदतीसाठी सरसावले आहेत.
...
शिरखुर्मा, शेवईचा गोडवा वाढणार
ईद-उल्-फित्रला ‘मिठी ईद’ असेही म्हणतात. यावेळी शिरखुर्मा, शेवई सर्वांसाठीच पर्वणी असते. संक्रमणामुळे यावर्षी एकमेकांना निमंत्रण नसले तरी, एकमेकांच्या घरी बॉक्स पोहोचवून हा आनंद वाटला जाणार आहे. मुलांना या ईदचे विशेष आकर्षण असते.
...
ईदचे नमाजपठण घरीच करा : मुफ्ती कदीर
मदरसा जामिया अरबिया इस्लामियाचे संचालक अमीरे शरीयत मुफ्ती अब्दुल कदीर खान यांनी, सरकारच्या नियमांचे पालन करून ईदचे नमाजपठण घरीच करा, सुरक्षात्मक उपायांचा अवलंब करा, महामारी मुक्तीसाठी अल्लाहकडे प्रार्थना करा, असे आवाहन केले आहे.
...
संयम पाळा, घरीच राहा : मौलाना मुर्तजा
शरीयत दारुल कजा नागपूरचे अध्यक्ष मौलाना मो. मुर्तजा यांनी, कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी संयम पाळा आणि घरातच राहा, घरूनच नमाजपठण करा, असे आवाहन केले आहे.
...
संक्रमणातून मुक्तीसाठी दुवा मागा, मदत करा
माजी प्राचार्य इलयास खान यांनी, या संक्रमणातून मुक्ती मिळावी यासाठी अल्लाहकडे दुवा मागा, असे आवाहन केले आहे.
अंसारनगर निवासी जुल्फेकार अहमद शानू यांनी, या पर्वावर गरजू लोकांना मदतीचे आवाहन केले आहे.
समाजसेवक जावेद इकबाल यांनी, ईदला गरिबांना मदत करून आनंद पसरवा, असे आवाहन केले आहे.
वैशालीनगर निवासी वसीम शेख यांनी तसेच डॉ. नेहल अहमद यांनी, संक्रमण टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, तर मोमिनपुरा निवासी फजलुर्रहमान कुरैशी यांनी, साधेपणाने आणि कुटुंबीयांसह ईद मनवा, असे आवाहन केले आहे.