लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीतील मविआच्या ८ पराभूत उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे दार ठोठावले आहे. या उमेदवारांनी शनिवारी विजयी उमेदवारांविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केल्या. विविध अनियमितता झाल्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात यावी व नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.
दक्षिण-पश्चिम नागपूरमधून विजयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध प्रफुल गुडधे, द. नागपूरमधून विजयी मोहन मते यांच्याविरुद्ध गिरीश पांडव, तिवसामधून विजयी राजेश वानखडे यांच्याविरुद्ध यशोमती ठाकूर, बल्लारपूरमधून विजयी सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध संतोषसिंग रावत, चिमूरमधून विजयी बंटी भांगडियांविरुद्ध सतीश वारजूरकर, राजुरा येथून विजयी देवराव भोंगळेंविरुद्ध सुभाष धोटे, वर्धा येथून विजयी डॉ. पंकज भोयर यांच्याविरुद्ध शेखर शेंडे, तर सिंदखेड राजा येथून विजयी मनोज कायंदेविरुद्ध डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी याचिका दाखल केली.