फसवणुकीचा गुन्हा दाखल : आरोपीचा शोध सुरूनागपूर : अजनी चौक येथील निर्यात करणाऱ्या एका व्यापाऱ्याची आठ लाख रुपयाने फसवणूक करण्यात आली. अशोक पाटील (५९) रा. आॅरेंज सिटी टॉवर अजनी चौक असे पीडित व्यापाऱ्याचे नाव आहे. पाटील यांचे फोनिक्स कॉर्पोरेशन नावाने कार्यालय आहे. ते विविध वस्तूंची निर्यात करतात. गोरखपूर उत्तर प्रदेश येथील व्यापारी उत्कर्ष चित्रास यांना पाटील यांनी ५०० मिली टन सोयाबीन केक (तेल काढल्यानंतर शिल्लक राहिलेले सोयाबीन) उपलब्ध करून देण्याबाबतचे आॅर्डर दिले होते. ५०० मिली टन सोयाबीन केकची किंमत १ कोटी ६० लाख रुपये आहे. यासाठी २ मार्च २०१४ रोजी आठ लाख रुपये अग्रिम दिले. करारानुसार उत्कर्ष यांना एका आठवड्यानंतर सोयाबीन केकचा माल द्यायचा होता. त्यानंतर उर्वरित रक्कम घ्यायची होती. परंतु एक आठवडा उलटूनही उत्कर्ष यांनी मालाचा पुरवठा केला नाही. पाटील यांनी खूप तगादा लावला. नऊ महिन्यांपर्यंत त्यांनी प्रतीक्षा केली. परंतु माल काही मिळाला नाही. त्यामुळे पाटील आपले पैसे परत मागू लागले. उत्कर्षने पाटील यांना एक डीडी पोस्टाने पाठविला. १० लाख रुपयाचा डीडी असल्याचे सांगणयात आले. परंतु डीडी बँकेत सादर करण्यात आला तेव्हा तो केवळ ३५१ रुपयाचा निघाला. त्यानंतरही पाटील आपले पैसे परत मागण्यासाठी दबाव टाकू लागले मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून अखेर पाटील यांनी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्याची आठ लाखाने फसवणूक
By admin | Published: January 02, 2015 12:50 AM