पतीचा रेल्वेतून पडून मृत्यू; पीडित माय-लेकाला आठ लाख रुपये भरपाई
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: February 24, 2023 05:56 PM2023-02-24T17:56:38+5:302023-02-24T17:59:03+5:30
६० दिवसांत रक्कम अदा करण्याचा आदेश
नागपूर :रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नी व मुलाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आठ लाख रुपये भरपाई व त्यावर ७.५ टक्के व्याज मंजूर केले. तसेच, ही रक्कम पीडितांना ६० दिवसांत अदा करण्याचा आदेश मध्य रेल्वेला दिला. प्रकरणावर न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
निर्मला व सचिन गडलिंग, अशी मायलेकाची नावे असून ते अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील रहिवासी आहेत. नागोराव गडलिंग, असे मृताचे नाव होते. ते ९ मे २०१५ रोजी नरखेड-भुसावळ पॅसेंजरने वरुड येथून बेनोड्याला जात होते. ते रेल्वे डब्ब्याच्या दारात उभे होते. वरुड यार्ड परिसरात धक्का लागून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पीडित मायलेकाने भरपाईसाठी रेल्वे न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. ३ मे २०१८ रोजी तो दावा खारीज करण्यात आला होता.
धावत्या रेल्वेतून खाली पडलेला प्रवासी रेल्वेखाली येऊ शकत नाही. गडलिंग यांच्या शरीराचे दोन भाग झाले होते. त्यामुळे ते रेल्वेतून खाली पडल्याचे सिद्ध होत नाही. तसेच, ते प्रामाणिक प्रवासी नव्हते, अशी कारणे दावा नाकारताना नमूद करण्यात आली होती. त्यामुळे पीडित मायलेकाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील मंजूर करून हा निर्णय दिला. गडलिंग यांच्याकडे प्रवासाचे तिकिट होते. त्यामुळे ते प्रामाणिक प्रवासी होते. तसेच, त्यांनी आत्महत्या केल्याचे किंवा ते रेल्वे ट्रॅक ओलांडताना रेल्वेखाली आल्याचे पुरावे नाही, असे उच्च न्यायालयाने हा निर्णय देताना स्पष्ट केले.