लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : काेंबड्यांच्या झुंजीवर जुगार लावणाऱ्या आठ जणांना उमरेड पाेलिसांनी ताब्यात घेतले असून, नंतर त्यांची सूचनापत्रावर सुटका करण्यात आली. त्यांच्याकडून तीन दुचाकी वाहनांसह १ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सायकी शिवारात रविवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली.
करण वाघाडे (२२), विक्की वाघाडे (२९), विशाल वाघाडे (२३), राकेश वाघाडे (२३), राहुल नेवारे (२८), देवानंद नेवारे (२८) सर्व रा. उंबरा तसेच किसन राऊत (३२, रा. आमघाट), रायभान वाघाडे (४५, रा. दहेगाव) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. सायकी शिवारात कोंबड्यांची झुंज सुरू असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी सायकी शिवारात धाड टाकली असता, काेंबड्याच्या झुंजींवर जुगार लावला जात असल्याचे निदर्शनास आले. लागलीच पाेलिसांनी कारवाई करीत आठ जणांना ताब्यात घेत घेत, त्यांच्याकडून तीन दुचाकी, चार काेंबडे व इतर साहित्य असा एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर त्यांना सूचनापत्र देऊन साेडून दिले.
याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी नाेंद केली असून, ही कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नीतेश डोर्लीकर, राजू डोर्लीकर, हरीश यंगलवार, विष्णू जायभाये, अनिल वाढीवे, टी. रामटेके, आशिष खराबे यांच्या पथकाने केली.