लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुष्काळी गावांच्या यादीत नागपूर जिल्ह्यातील आठ महसूल मंडळाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. हे मंडळ नागपूर ग्रामीण, हिंगणा, रामटेक, कुही आणि उमरेड तालुक्यातील आहेत.शासनाने राज्यातील १८० तालुक्यात दुष्काळ सदृश असल्याचे जाहीर केले होते. दृष्काळ मात्र १५१ तालुक्यातच जाहीर केला होता. यात नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल आणि कळमेश्वर तालुक्याचा समावेश होता. दुष्काळी भागात मदतीचा प्रस्तावही केंद्र्र शासनाकडून पाठविण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर करण्यावरून शासनावर मोठी टीका झाली. त्यानंतर आता पुन्हा शासनाने महसूल मंडळनिहाय दुष्काळी भाग जाहीर केला आहे. नागपूर जिल्ह्यातील आठ महसूल मंडळांचा समावेश आहे. यात नागपूर ग्रामीण तालुक्यातील गोधणी, हिंगणा तालुक्यातील आडेगाव, टाकळघाट, रामटेक तालुक्यातील देवलापार, उमरेड तालुक्यातील मकरधोकडा, हेवती, पाचगाव तर कुही तालुक्यातील मांडळ महसूल मंडळाचा समावेश आहे. दुष्काळी भागाप्रमाणे याही भागातील महसुलात सूट, कृषी पंपाच्या बिलात ३३ टक्के सूट, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार असून कर्जाचे पुनर्गठन होईल.