आकांक्षा कनोजिया / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निर्बंधांनंतरही शहरातून दररोज आठ किलो टन प्लास्टिकच्या कचऱ्याचे उत्सर्जन होत आहे. महानगरपालिकेने या समस्येवर अंकुश लावण्यासाठी आतापर्यंत कोणतीच योजना राबविलेली नाही. २०१६ मध्ये सरकारने प्लास्टिकवर निर्बंध लावले होते. दोन वर्षांपूर्वी प्लास्टिकपासून मुक्ती मिळविण्यासाठी एनजीटीद्वारे निर्देशही जारी करण्यात आले होते. त्यात प्रत्येक शहराला प्लास्टिकच्या सिस्टमॅटिक डिस्पोजलसंदर्भात ॲक्शन प्लॅन सादर करण्यास सांगितले होते. ही माहिती सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाला द्यायची होती; परंतु, या संदर्भात महानगरपालिका अजूनही ॲक्शनमध्ये आलेली नाही.
दोन वर्षांत १८ हजार टन प्लास्टिक केले गोळा
शहरातून दररोज आठ टन प्लास्टिकचा कचरा उत्सर्जित होतो. सिस्टिमॅटिक डिस्पोजल ॲक्शन प्लॅन तयार नसल्याने हा प्लास्टिक कचरा ईपीआर व पीआरओ या खासगी कंपन्यांकडून गोळा केला जातो. गेल्या दोन वर्षांत ईपीआरने १८ हजार मॅट्रिक टन प्लास्टिक गोळा केला होता. आता महानगरपालिकेच्या संयुक्त तत्त्वावधानात खासगी कंपनी हा कचरा गोळा करते आणि रिसायकलिंग व सिमेंट प्लांटमध्ये पाठविला जातो.
सिस्टिमॅटिक डिस्पोजल ॲक्शन प्लानसंदर्भात महापालिका उदासीन
सिस्टिमॅटिक डिस्पोजल ॲक्शन प्लॅनसंदर्भात महापालिकेचे धोरण उदासीन आहे. या संदर्भात महापालिकेचे अधिकारी बोलण्यास टाळाटाळ करतात. महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनीही बोलण्याचे टाळले. डम्पिंग यार्डचे इन्चार्ज यांच्या संवाद साधला असला त्यांना या प्लानसंदर्भात काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.
इंडस्ट्रीमध्ये होत आहे डिस्पोजल
इंडस्ट्रीमध्ये प्लास्टिकचे सिस्टिमॅटिक डिस्पोजल केले जात आहे. यावर एमपीसीबी लक्ष ठेवत असते. मला मिळालेल्या माहितीनुसार इंडस्ट्रीजमधून निघणाऱ्या प्लास्टिक वेस्टचे डिस्पोजलचे काम खासगी कंपनीला देण्यात आले आहे.
- हेमा देशपांडे, उपक्षेत्रीय अधिकारी, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड
................