नागपूर : आठवडाभरापूर्वी कोराडी वीज केंद्रातील राखेचा बंधारा फुटल्याने येथे बुडालेले आठ ट्रक अद्यापही पाण्यातच बुडालेले आहेत. आठवडाभर लाेटूनही ट्रक बाहेर न निघाल्याने ट्रक मालकांमध्ये असंताेष आहे. या घटनेसाठी महावितरण व राख कंत्राटदार एकमेकांकडे बाेट दाखवत असून त्यामुळे ट्रक मालकांना लाखाे रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
काेराडी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील राख साठवणूक हाेणाऱ्या बंधाऱ्याच्या आतमधील बंधारा ६ फेब्रुवारीला पहाटे ५ वाजताच्या दरम्यान फुटला हाेता. हा बंधारा फुटताच पाण्याच्या लाेंढ्यात येथे राखेची उचल करण्यासाठी उभे असलेले आठ ट्रक पूर्णपणे बुडाले हाेते. ते ट्रक अद्यापही बाहेर काढणे शक्य झाले नाही. काेराडी वीज केंद्र प्रशासनाने पंपद्वारे पाणी काढण्यात येत असल्याचे सांगितले हाेते. मात्र आठवडाभर लाेटूनही एक फूट पाण्याचाही उपसा न झाल्याने ट्रक निघू शकले नाही. जसजसे दिवस जात आहेत, ट्रक मालकांना धडकी भरत आहे. साेमवारी या ट्रकमालकांनी पत्रपरिषदेत आपला असंताेष व्यक्त केला.
या डॅममध्ये लीलाराम राऊत यांचे दाेन तर निखिल भुरकुंडे, आलाेक डागा, निकेतन पाैनीकर, मंगेश जांगडे, असद मलिक व वाल यांचे प्रत्येकी एक ट्रक बुडाले आहेत. निखिल भुरकुंडे यांनी सांगितले, डॅममध्ये अंदाजे ३० फूट पाणी आहे. १० पंप लावले तर २४ तासात पाणी निघेल पण एका पंपने काम केले जात असून सहा दिवसात एक फूटही पाणी कमी झाले नाही. ट्रक पाण्यात असल्याने ते पूर्णपणे खराब हाेण्याची भीती आहे.
महावितरणचे मुख्य अभियंता यांच्याशी भेटले असता, त्यांनी राखेचे कंत्राट असलेल्या एजेन्सीवर खापर फाेडत आपली जबाबदारी झटकली. त्यांनी अपघात स्थळी भेटसुद्धा दिली नसल्याचे ट्रकमालकांनी सांगितले. दुसरीकडे कंत्राटदार एजेन्सी महावितरणकडे बाेट दाखवत असल्याचे भुरकुंडे यांनी सांगितले. यात ट्रक मालकांचे नुकसान हाेत असताना काेराडी पाेलीस प्रशासनाने साधी एफआयआरसुद्धा नाेंदविली नसल्याचा आराेप त्यांनी केला. त्यामुळे संतापलेल्या ट्रकमालकांनी काेराडी प्रशासनासमाेर सामुहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यावेळी सर्व ट्रकमालक उपस्थित हाेते.