नागपूर : म्युकरमायकोसिसचा फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झालेल्या रुग्णांचा दर २० टक्के तर सायनस, डोळे आणि मेंदूमध्ये इन्फेक्शन झालेला रुग्णांचा दर ८० टक्के आढळून येतो. हा आजार पुरुष व ५० वर्षे वयोगटातील लोकात जास्त दिसून येतो. अनियंत्रित मधुमेह आणि स्टेरॉईड थेरपी दिलेल्या ९० टक्के रुग्णांमध्ये या आजाराची जोखीम वाढते. कोविडदरम्यान ४० टक्के रुग्णाला तर, कोविडनंतर साधारण १५ दिवसाच्या आत ६० टक्के रुग्णांना या आजाराचा धोका असतो, अशी माहिती मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. राहुल कुलकर्णी यांनी दिली.
‘इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी’ विभागाद्वारे ‘कोविड पॅन्डमिक’मधील ‘फंगल अॅपिडेमिक’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन ट्रॉपिकल न्यूरोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. निर्मल सूर्य यांनी केले. अध्यक्षस्थानी अमेरिकेचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. पी. एच. चंद्रशेखर होते. चर्चासत्रात रेडिओलॉजिस्ट डॉ. संजय वैद, संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. संजय पुजारी, ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉ. पुष्कर गद्रे आणि ईएनटी सर्जन डॉ. विक्रम ओक सहभागी झाले होते. प्रास्ताविक ‘डब्ल्यूएफएनच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुप’चे अध्यक्ष आणि सत्राचे संयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले. डॉ. म्युकरमायकोसिस आजाराची गंभीरता टाळण्यासाठी लवकर निदान व उपचार महत्त्वाचा ठरतो.
-मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रीय रजिस्ट्रीची गरज
डॉ. निर्मल सूर्य म्हणाले, म्युकरमायकोसिस या रोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रीय रजिस्ट्री आणि मल्टीसेंट्रिक संशोधन विकसित करण्याची गरज आहे. डॉ. संजय वैद म्हणाले, या आजाराचे उशिरा निदान होत असल्याने चिंता वाढली आहे. डॉ. संजय पुजारी यांनी ‘म्युकरमायकोसिस’ ही एक वैद्यकीय आणीबाणी असल्याचे सांगून मधुमेहावर त्वरित नियंत्रण फार महत्त्वाचे आहे. यावरील उपचार महागडे असून तीन ते सहा महिने घ्यावे लागतात. स्टेरॉईड योग्य रुग्णात, योग्य वेळी, योग्य डोसमध्ये आणि योग्य कालावधीसाठी वापरायला हवा, असेही ते म्हणाले.
-भारत म्युकरमायकोसिसची राजधानी ठरण्याची शक्यता
डॉ. पी.एच. चंद्रशेखर म्हणाले, भारत मधुमेहाची राजधानी आहे. तातडीने पावले उचलल्या गेली नाही तर म्युकरमायकोसिसची राजधानी होण्याची शक्यता आहे. कोविड जगात सर्वत्र असला तरी बुरशीजन्य संसर्ग इतर देशात दिसून येत नाही. म्हणूनच रुग्णालयाच्या आत व बाहेर संसर्गाचे स्रोत शोधण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. डॉ. गद्रे यांनी म्युकरमायकोसिसवरील शस्त्रक्रियेची माहिती दिली. डॉ. ओक यांनी निदान आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये अनुनासिक एन्डोस्कोपीच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.