लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : टपाल विभागातर्फे आता आपल्या ‘कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी)’ची यंत्रणा विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, विदर्भ टपाल विभागात ८० टपाल घरांमध्ये हे सेंटर सुरू केले जात आहे.
जास्तीत जास्त राजस्व गोळा करण्यासाठी टपाल खात्याच्या कॉमन सर्व्हिस सेंटरकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या माध्यमातून नागरिक आधार अपडेट, पासपोर्ट, पॅनकार्ड बनवू शकणार आहेत. पीएम गृहनिर्माण योजना, पीएम पिक विमा योजना, रेशनकार्ड, अन्न व औषधी परवाना, एफसीआय रजिस्ट्रेशन, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, जीवन प्रमाणपत्र, रेल्वे आरक्षण आदींची सुविधा याद्वारे मिळणार आहे. टपाल घरांमध्ये हे सेंटर सुरू झाल्याने नागरिकांना सुविधा होणार आहे. या सेवेमुळे नागरिकांना अतिरिक्त पायपीट करावी लागणार नाही. जवळच्याच टपाल घरात जाऊन कागदपत्रे जमा करून आपली कामे सहज करता येणार आहेत.