पोलिसांनी सावित्रीला का केले नाही आरोपी ?राहुल अवसरे - नागपूरएका परप्रांतीय मुलीचे विक्री प्रकरण पोलिसांकडूनच बेदखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. खुद्द पीडित मुलीच्या माता-पित्याकडून आणि अन्य माहितीगार सूत्रांकडून या प्रकरणाची माहिती प्राप्त झाली. पीडित मुलगी ही १६ वर्षांची असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात ती दहा-बारा वर्षांची असावी. मंगळवारी तिला करुणा शासकीय वसतिगृहातून न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायालयाने तिची ‘इन कॅमेरा’ विचारपूस केली. ही मुलगी मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील आणि नरसिंहगड तालुक्यातील बेरसिंगा कंझर डेरा येथील रहिवासी आहे. तिला आणखी पाच बहिणी आणि दोन भाऊ आहेत. माता-पिता शेतमजुरी करतात. ते अत्यंत गरीब आहेत. ती अंगणवाडीत शिकते, असे तिच्या वडिलाने सांगितले. सावित्रीबाई नावाची माहिला आपल्या अन्य नातेवाईकांच्या मदतीने डेऱ्यावर यायची. तीन -चार महिन्यापूर्वी डेऱ्यावर येऊन तुमची मुलगी आम्हाला पसंत आली. मी सोबत घेऊन जाते आणि माझ्या मुलासोबत लग्न करून देते. ती सुखात राहील, असे सावित्रीबाईने सांगितले होते. त्यानंतर शिवपुरी डाबरपुरा येथे बोलणी होऊन सावित्रीबाई या मुलीला सोबत घेऊन निघून गेली होती. वस्तुत: सावित्रीबाई ही नागपूरच्या गंगाजमुना येथे देहविक्रीचा अड्डा चालविते, याबाबतची कल्पना बिचाऱ्या गरीब मातापित्याला नव्हती. प्रत्यक्षात सावित्रीबाईने मुलीला गंगाजमुनात आणून तिला धंद्यात गुंतवले होते. २ डिसेंबर २०१४ रोजी ‘एनजीओ’ने पोलिसांची मदत घेऊन पीडित मुलीची सोडवणूक केली होती. त्यानंतर या मुलीला करुणा शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले. आपल्या मुलीला देहविक्रीच्या धंद्यात गुंतवण्यात आल्याचे समजताच मातापित्याने आपल्या स्वगृही पोलिसांकडे तक्रार करून ते नागपुरात आले. लकडगंज पोलीस ठाण्यात त्यांनी चौकशी केली असता त्यांची मुलगी शासकीय वसतिगृहात असल्याचे त्यांना समजले. लागलीच त्यांनी मुलीचा ताबा मिळावा यासाठी न्यायालयाची लढाई सुरू केली आहे. सावित्रीला ठाण्यात आणले पण...सावित्रीच्या अड्ड्यावरून पीडित मुलीची सोडवणूक झाल्यानंतर पोलिसांनी सावित्रीला पोलीस ठाण्यात चौकशीला बोलावले होते. त्यावेळी तिने पीडित मुलीचे खोटे नाव सांगून ती आपली स्वत:ची मुलगी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर हळूच तिने सौदेबाजी करून स्वत:ची सुटका करून घेतली होती. गंभीर प्रकरण असतानाही सावित्रीला का आरोपी करण्यात आले नाही, असा प्रश्न अनुत्तरित आहे.
परप्रांतीय मुलीचे विक्री प्रकरण बेदखल
By admin | Published: December 25, 2014 12:26 AM