नागपूर : अतिदुर्गम भागातील एकलव्य एकल विद्यालयातील शिक्षक व पर्यवेक्षक हे केवळ तेथील मुलांना शिक्षण देणारे गुरू नसून ते आदिवासी समाजात चेतना निर्माण करणारे प्रहरी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्र कार्यकारिणीचे सदस्य दीपक तामशेट्टीवार यांनी केले.
लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेद्वारे विदर्भातील आठ जिल्ह्यातील आदिवासीबहुल अतिदुर्गम क्षेत्रातील मुलांकरिता चालवल्या जाणाऱ्या एकलव्य एकल विद्यालयातील शिक्षक व पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात झाले. त्यावेळी उपस्थित शिक्षक आणि पर्यवेक्षकांशी तामशेट्टीवार यांनी संवाद साधला. संस्थेचे संचालक सुधीर दिवे, संस्थेचे सचिव राजीव हडप, कोषाध्यक्ष अतुल मोहरील, वसंत चुटे, अनिल जोशी, रवींद्र भुसारी आदी याप्रसंगी उपस्थित होते. २७ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गात विदर्भातून ११४० शिक्षक व पर्यवेक्षक सहभागी झाले आहेत.
तामशेट्टीवार म्हणाले, आदिवासी भागातील मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता कौशल्य विकास करून त्यांना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. भाषा, संस्कृतीची जपणूक करत नागरी शिष्टाचार, देशप्रेमाचेही धडे देण्याची गरज आहे. जनजातींमधील अनिष्ट चालीरितींना नष्ट करून बाहेरच्या आक्रमणापासून त्यांचा या शिक्षकांनी बचावही करायचा आहे व समाजात आदर्श प्रस्थापित करायचा आहे. कार्यक्रमाचे संचालन भारत भुजाडे यांनी संजय पुजारी यांनी आभार मानले.