नागपूर: आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात खैरी परसोडा, रामटेक एकलव्य निवासी शाळा एका भाड्याच्या इमारतीत अनेक वर्षापासून सुरू आहे. पण ही इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. विशेष म्हणजे नवीन इमारत दोन वर्षापासून तयार आहे. परंतु राजकीय दडपणामुळे शाळा शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यास आदिवासी विकास विभागाचे अधिकारी हतबल ठरताहेत. ही पडकी इमारतीतून शाळा लवकरात लवकर नवीन इमारतीत शिफ्ट व्हावी, म्हणून मंगळवारी पालक शाळेत धडकले. जून्या इमारतीच्या दूर्दशेवरून पालकांनी मुख्याध्यापकांना चांगलेच धारेवर धरले.
या इमारतीचे अनेकदा छताचे काँक्रीट कोसळून विद्यार्थी थोडक्यात बचावले. गळक्या छतामुळे वर्ग खोली व निवासी खोल्यात पाणी साचून इलेक्ट्रीक उपकरणात शिरल्यामुळे करंट लागून विद्यार्थ्याचा जीव जावू शकतो अशी स्थिती आहे. त्यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त करून अश्या नरक यातना जुन्या इमारतीत भोगण्यापेक्षा आम्ही आपल्या पाल्यांना आमच्या घरी घेऊन जावू असे मुख्याध्यापक यांना ठणकावले.