नागपूर : शिवसेनेतील बंडाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता विदर्भावर लक्ष केंद्रित करण्याचा प्लॅन आखला आहे. याचाच भाग म्हणून शिंदे गटाने आपल्या शिवसेनेचे विदर्भातील जिल्हा प्रमुख नेमले आहेत. रामटेकचे खा. कृपाल तुमाने, आ. आशिष जयस्वाल व किरण पांडव हे शिंदे गटात सहभागी झालेले तिन्ही नेते मंगळवारी यासंदर्भातील घोषणा करणार आहेत.
शिवसेनेचे नागपूर जिल्हा प्रमुख राहिलेले संदीप इटकेलवार यांनी सुरुवातीलाच शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाकडून त्यांना नागपूर जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्तीपत्रही देण्यात आले. यानंतर विदर्भातील इतर जिल्ह्यातही जिल्हा प्रमुख नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेत प्रत्येक जिल्ह्यात दोन जिल्हा प्रमुख व महापालिकेच्या ठिकाणी दोन शहर प्रमुख नेमले जातात. मात्र, शिंदे गटाने असे न करता एकच जिल्हा प्रमुख व शहर प्रमुख नेमण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील सहा जिल्हा प्रमुख व तीन शहर प्रमुखांची नावे निश्चित झाली आहेत. त्यांची घोषणा मंगळवारी केली जाणार आहे.
भाजपकडून कमी लेखले जाऊ नये
- शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही आगामी निवडणुका भाजपशी युती करून लढेल, हे स्पष्ट आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक तिकिटांची वाटाघाटी करताना शिंदे गटाला कमी लेखले जाऊ नये, याची काळजी आतापासूनच घेतली जात आहे.
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका विचारात घेता प्रत्येक महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात येत्या दोन महिन्यांत संघटनात्मक बांधणी करण्याची योजना आखण्यात आली आहे.