नागपूर : काही दिवसांपासून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार, मुख्यमंत्री बदलणार, नवा मुख्यमंत्री कोण होणार, अशी एकच चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे. दरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘एकनाथ शिंदे टायगर है, उन्हे कोई बदल नही सकता’ असे सांगत शिंदेना धोका नाही, असा दावा गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
नागपूर विभागातील खरीप हंगाम नियोजन पूर्व आढावा बैठकीनंतर वनामती येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून राज्यात मुख्यमंत्री होण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा दर्शविली होती. त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्यासंदर्भात काही हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगली. त्यामुळे पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी उपरोक्त दावा केला.
सत्तार म्हणाले, ‘राधाकृष्ण विखे पाटील हे माझे मित्र आहेत. त्या मैत्रीच्या भावनेतून मी ते वक्तव्य केले. परंतु याचा अर्थ एकनाथ शिंदे यांना हटवून विखे पाटील यांना मुख्यमंत्री करावे, असा होत नाही. एकनाथ शिंदे हे आमच्या पक्षाचे सुप्रिमो आहेत. ते टायगर आहेत. त्यांना कुणी बदलू शकत नाही. अजित पवार सरकारमध्ये आले तर आपली काय भूमिका राहील, असा प्रश्न विचारला असता, ‘यासंदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत. ते जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य राहील’, असेही कृषीमंत्री सत्तार यांनी स्पष्ट केले.
- संजय राऊत यांचे ‘मुंगेरीलालके हसीन सपने’
खा. संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार काही दिवसात कोसळेल असा दावा केला आहे, याबाबत विचारले असता कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, ‘संजय राऊत यांचे डाेके तपासून पाहावे लागेल. त्यांनी आतापर्यंत जे जे सांगितले त्यातील एकही गोष्ट पूर्ण झालेली नाही. त्यामुळे संजय राऊत यांचे स्वप्न म्बहणजे मुंगेरीलालके हसीन सपने असेच म्हणावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.