नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी, मुंबई येथे आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला पूर्व विदर्भातून बळ देण्यात आले आहे. मंगळवारी पूर्व विदर्भातून १२० ट्रॅव्हल्स बस व खासगी गाड्यांचा ताफा कार्यकर्ते घेऊन मुंबईसाठी रवाना झाला. नागपूर शहर व जिल्ह्यातून एकूण ४० बस आमदार निवास येथून रवाना करण्यात आल्या.
दसरा मेळाव्यात गर्दी खेचण्यासाठी शिंदे गटाने नागपूरसह पूर्व विदर्भात जय्यत तयारी केली. पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव यांच्यावर या नियोजनाची जबाबदारी आहे. खा. कृपाल तुमाने, आ. आशीष जयस्वाल, जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार, नागपूर शहर संपर्क प्रमुख मंगेश काशीकर आदींनी संपूर्ण ताकद लावली. मंगळवारी दुपारी नेत्यांनी भगवा झेंडा दाखवत आमदार निवास येथून नागपुरातील बसचा ताफा रवाना केला. एकनाथ शिंदे यांचा मुखवटा असलेले शेकडो कटआऊटही बसमध्ये नेण्यात आले.
पूर्व विदर्भातून पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रवाना झाले आहेत. सिरोंचा, भामरागड यासारख्या भागांतूनही कार्यकर्ते गेले आहेत. हे सर्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. पूर्व विदर्भाने शिंदे यांच्या पाठिशी आपली ताकद उभी केली आहे, असा दावा यावेळी पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव यांनी केला.
उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकही रवाना
- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे नेते आ. दुष्यंत चतुर्वेदी, जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांच्यासह नागपुरातील कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झाले. बहुतांश कार्यकर्ते रेल्वेनेच गेले. मुंबईत जाण्यासाठी पक्षाकडून पाहिजे तसे नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे इच्छा असूनही आम्ही जाऊ शकलो नाही, अशी खंत एका जुन्या शिवसैनिकाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.