लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: दारूचे व्यसन, दारूच्या नशेत कुटुंबीयांना केली जाणारी शिवीगाळ, त्यातून घरात दोन भावांमध्ये रोज उद्भवणारी भांडणे, याचे पर्यवसान शुक्रवारी (दि. १७) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास हाणामारीत झाले. त्यातच थोरल्या (मोठ्या) भावाने दारूचे व्यसन असलेल्या धाकट्या (लहान) भावाच्या डोक्यावर लाकडी काठीने वार केले. त्यात धाकट्याचा मृत्यू झाला. खुनाची ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवरी येथे घडली असून, पोलिसांनी आरोपी मोठ्या भावास लगेच अटक केली.
किशोर अखंड (३८) असे मृताचे तर सुधाकर अखंड (४२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोघेही सख्खे भाऊ असून, ते गोवरी, ता. कळमेश्वर येथे एकाच घरी राहतात. किशोरला दारूचे व्यसन होते. तो दारू पिऊन घरी आल्यानंतर कुटुंबीयांना शिवीगाळ करायचा. त्यामुळे घरातील मंडळी त्रासली होती. कुटुंबीयांनी त्याला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या वागण्यात सुधारणा झाली नाही.
दरम्यान, तो शुक्रवारी रात्रीही दारू पिऊन घरी आला होता. त्याने नेहमीप्रमाणे शिवीगाळ करायला सुरुवात करताच कुटुंबीयांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. तो कुणाचेही ऐकत नसल्याने सुधाकरने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच वाद विकोपास गेला आणि सुधाकरने रागाच्या भरात त्याला काठीने मारहाण करायला सुरुवात केली. डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याला लगेच कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी सुधाकरला ताब्यात घेत अटक केली. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज खडसे करीत आहेत.चार दिवसांचा ‘पीसीआर’पोलिसांनी आरोपी सुधाकरला ताब्यात घेत कसून विचारपूस केली. तेव्हा सुधाकरने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. शिवाय, पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत त्याने किशोरला मारहाण करण्यासाठी वापरलेली काठी जप्त केली. त्याला शुक्रवारी कळमेश्वर येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला चार दिवसांची अर्थात मंगळवारपर्यंत (दि. २१) पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.