जिजामातानगरात राहणारे वृद्ध तायडे दाम्पत्य सकाळपासून रात्रीपर्यंत चहा- नाश्त्याची टपरी चालवून आपल्या दोन वेळेच्या भाजीभाकरीची सोय करीत होते. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ते चहाची टपरी सुरू करण्यासाठी आले असता ती आगीत खाक झाल्याचे चित्र दिसले. बास, बल्ली, बोरे अन् लाकडी टेबलवजा टपरी पुरती जळून गेली होती. त्यामुळे तायडे दाम्पत्याचे अवसानच गळाले. जगण्याचे साधन अन् रोजीरोटीचा आसरा असलेली टपरी जळाल्याने आता कसे जगायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांना ही माहिती कळताच ते मोठ्या संख्येत गोळा झाले. त्यांनी वृद्ध दाम्पत्याच्या टपरीची जाळपोळ करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली. तणाव वाढत असल्याची माहिती कळताच वाठोडा पोलीस घटनास्थळी पोहचले. रात्रीपर्यंत या प्रकरणा समाजकंटकाला अटक झाली नव्हती.
---