कामठी (नागपूर) : वृद्ध शेतकऱ्याने गादा (ता. कामठी) शिवारातील नाल्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी (दि. २०) सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आले. त्याने नापिकी आणि कर्ज परतफेडीच्या विवंचनेतून आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली असून, खासगी बॅंकेचे ३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नामदेव चिंधू खुरपडी (७५, रा. गादा, ता. कामठी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गुरुवारी (दि. १९) सकाळी ८ वाजताच्या सुमारास शेतात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. रात्री घरी न आल्याने शुक्रवारी सकाळी कुटुंबीयांनी त्यांचा शेताच्या परिसरात शाेध घ्यायला सुरुवात केली. साेबतच ते बेपत्ता असल्याची तक्रारही पाेलिसात नाेंदविली. त्यातच गादा-गुमथळा मार्गावर असलेल्या नाल्याच्या काठी त्यांचे कपडे व खाेल पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला.माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणला. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.
आयसीआयसीआय बॅंकेचे कर्ज
नामदेव खुरपुडी यांच्याकडे साडेतीन एकर शेती असून, ते दरवर्षी बॅंकेकडून कर्ज घ्यायचे व परतफेड करायचे. त्यांनी यावर्षी आयसीआयसीआय बॅंकेच्या महालगाव (ता. कामठी) शाखेकडून ३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले हाेते. सततच्या पावसामुळे पीक खराब झाल्याने तसेच पत्नीच्या आजारपणामुळे ते चिंतित असल्याची माहिती त्यांचा मुलगा जस्वीन यांनी दिली.