मुलाकडून घराचा ताबा घेण्यासाठी वयोवृद्ध आईची हायकोर्टात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2022 07:23 PM2022-10-25T19:23:37+5:302022-10-25T19:24:18+5:30
Nagpur News गुंड प्रवृत्तीच्या मुलाकडून घराचा ताबा मिळावा, याकरिता गडचिरोली येथील एका वयोवृद्ध आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
नागपूर : गुंड प्रवृत्तीच्या मुलाकडून घराचा ताबा मिळावा, याकरिता गडचिरोली येथील एका वयोवृद्ध आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या पीडित आईचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर माता-पिता निर्वाह न्यायाधिकरणचे पीठासन अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह मुलाला व सुनेला नोटीस बजावून यावर चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पीडित आई ७३ वर्षांची असून, ती मुलगा व सुनेच्या छळापासून स्वत:ला वाचविण्यासाठी सध्या भाड्याच्या घरात राहात आहे. ती एका पायाने अपंग आहे. त्यामुळे ती सामान्यपणे चालू शकत नाही, तसेच तिला एका डोळ्याने दिसतही नाही. तिला तीन मुले आहेत. दुसऱ्या क्रमांकाच्या मुलाने तिच्या घराचा ताबा घेतला आहे. या मुलाच्या गुंड प्रवृत्तीमुळे इतर मुले आईला मदत करीत नाहीत. संबंधित मुलाला घरातून बाहेर काढण्यासाठी आईने सुरुवातीला माता-पिता निर्वाह न्यायाधिकरणात तक्रार दाखल केली होती. न्यायाधिकरणने १ ऑक्टोबर २०२१ रोजी ती तक्रार मंजूर करून आईकडे घर कायम ठेवण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. परंतु, पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे आईने जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज सादर केला. त्यांनीही दखल घेतली नाही. परिणामी, तिने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आईतर्फे ॲड. विजय मोरांडे यांनी बाजू मांडली.
वडिलांच्या निधनानंतर छळ वाढला
वडिलांचे १७ एप्रिल २०१५ रोजी निधन झाल्यानंतर संबंधित मुलाने आईचा जास्त छळ करायला सुरुवात केली. त्याचा आधीपासूनच घरावर डोळा होता. त्याकरिता तो वडिलांवर दबाव आणत होता. त्यामुळे आईने २० जुलै २०१२ रोजी पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविली होती.
पोलिसांपुढे माफी मागितली होती
आईच्या तक्रारीनंतर गडचिरोली पोलिसांनी मुलाला बोलावून कारवाईची तंबी दिली होती. दरम्यान, मुलाने आईची माफी मागून पुन्हा त्रास देणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु, तो सुधारला नाही. त्याने आईचा छळ सुरूच ठेवला. आई बाहेरगावी गेल्यानंतर तो घरातील सामानही विकत होता.