नागपूर : ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन १० जानेवारीपासून सहव्याधी असलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘बूस्टर’ डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. असे असलेतरी नागपूर शहरात दीड लाखांवर वृद्धांनी अद्याप पहिलाही डोस घेतला नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
‘ओमायक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढली आहे. वेगाने पसरणाऱ्या या व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात दिसून येत आहेत. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणूचे तीन रुग्ण आढळून आले आहेत, तर कोरोनाच्या रुग्णांची संख्याही मागील पाच दिवसांपासून वाढत चालली आहे. मंगळवारी सहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच रुग्णांची संख्या ४४ झाली. कोरोनावर प्रतिबंधक लसीकरण हाच पर्याय आहे; परंतु याचा सर्वाधिक धोका असलेल्या ६० वर्षांवरील १ लाख ५१ हजार ३९७ ज्येष्ठांनी पहिला डोस घेतलेला नाही.
अडीच लाख ज्येष्ठांना मिळणार बूस्टर डोस
नागपूर शहरात ६०वर्षांवरील ज्येष्ठांची लोकसंख्या ४ लाख २४ हजार ६४५ आहे. यातील २ लाख ५ हजार ४२४ लोकांनी दुसरा डोस घेतला. सहव्याधी असलेल्या ६० वर्षांवरील ज्येष्ठांना ‘बूस्टर’ डोस देण्यात येणार आहे. त्यानुसार दुसरा डोस घेतलेल्या जवळपास अडीच लाख ज्येष्ठांना हा डोस मिळण्याची शक्यता आहे.
३५ हजारांवरील हेल्थ केअर वर्कर्संना मिळणार बूस्टर डोस
शहरात आतापर्यंत ४९ हजार ६५६ हेल्थ केअर वर्कर्संनी पहिला, तर ३० हजार ४८५ वर्कर्संनी दुसरा डोस घेतला आहे. १० जानेवारीपासून ‘बूस्टर’ डोसला सुरुवात होणार असल्याने जवळपास ३५ हजारांवरील वर्कर्संना बूस्टर डोस मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
४ लाख मुलांना मिळणार लस
३ जानेवारीपासून १५ ते १८वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. शहराचा विचार करता जवळपास ४ लाख मुलांना ही लस मिळण्याची शक्यता आहे.