लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : निवडणूक आयोगाच्या कामात विशिष्ट पक्ष हस्तक्षेप करत असल्याचा आरोप लावणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात आयोगाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणूक उपायुक्त सुदीप जैन यांनी बॅनर्जी यांना पत्रच लिहून आयोगाची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. कुठल्याही राजकीय पक्षासमवेत कथित जवळीक असल्याचे आरोप लावून प्रश्न उपस्थित करणे हे आयोग खपवून घेणार नाही. असे करणे म्हणजे निवडणूक आयोगाचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न आहेत, असे त्यांनी थेट म्हटले आहे.
आम्ही सर्वच पक्षांच्या तक्रारी गंभीरतेने ऐकत आहोत. सर्वच पक्षांची बाजू ऐकून घेण्यासाठी निवडणुकीच्या अगोदर सर्व पक्षांसमवेत बैठका केल्या. १७ डिसेंबर २०२० रोजी दिल्ली व कोलकाता येथे तृणमूल कॉंग्रेसच्या प्रतिनिधींशीदेखील भेट घेतली होती. मात्र तरीदेखील जर मुख्यमंत्री निवडणूक आयोगाला राजकीय पक्षांशी भेटण्यासंदर्भात सल्ला देत असतील तर हे चुकीचे आहे. निवडणूक आयोगाचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्याकडून वारंवार निवडणूक आयोगावर टीका करण्यात येत आहे. एका विशिष्ट पक्षासाठी आयोग काम करत असल्याचा आरोप त्यांना लावला आहे. मंगळवारीच एका प्रचार सभेदरम्यान त्यांनी जर भाजपाने आयोगाच्या कामात हस्तक्षेप करणे बंद केले नाही तर आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. नंदीग्राम येथे मागील आठवड्यात त्या जखमी झाल्या होत्या व त्यांनी हा भाजपचा हल्ला असल्याचा आरोप लावला होता. मात्र निवडणूक आयोगाने तो अपघात असल्याचा निर्वाळा देत सुरक्षायंत्रणेची चूक असल्याचे म्हटले होते. सुरक्षा प्रभारी विवेक सहाय यांना हटविले होते. बॅनर्जी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून संबंधित घटनेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. शिवाय सहाय यांना परत नियुक्त करण्याचीदेखील मागणी केली.