नागपूर : निवडणूक आयोगाने भाजपच्या स्क्रिप्टवर निर्णय दिला व हा निर्णय घटनाबाह्य आहे. शिंदे गटाने घेतलेली भूमिका ही पक्षद्रोही असून, घटनेच्या परिशिष्ट दहा हे पक्षांतर बंदीचे उल्लंघन आहे. शिंदे गटाने एकाच वेळी पक्ष सोडला नाही तर टप्प्याटप्प्यात गेले व भाजप शासित राज्यात गेले. ईडी सीबीआयप्रमाणे आता निवडणूक आयोग पण विकाऊ झाले आहे, असा आरोप करीत मातोश्रीवर ताबा मिळविण्याचे यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असा दावा ठाकरे गटाचे खा. अरविंद सावंत यांनी केला.
खा. अरविंद सावंत हे पूर्व विदर्भातील शिवसंवाद यात्रेसाठी मंगळवारी नागपुरात दाखल होऊन भंडारासाठी रवाना झाले. १ मार्च रोजी गोंदिया व २ मार्च रोजी वर्धा येथे जाऊन ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले, कायद्यानुसार पक्ष सोडणाऱ्यांना स्वत:चे स्वतंत्र गट तयार करता येत नाही. त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागते. यापैकी काहीही शिंदे गटाने केलेले नाही. शिवाय ते एकाच वेळी बाहेर पडले नाहीत, तर गटागटाने निघाले. २००३ मध्ये करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीनुसार केवळ वैयक्तिकच नव्हे, तर सामूहिक पक्षांतरालाही घटनाबाह्य घोषित केले गेले आहे.
शिवसेनेने राज्यात १२४ जागा लढवल्या व ५५ जिंकल्या. बंडखोरांसह संपूर्ण १२४ जण शिवसेनेचा एबी फार्म आणि पक्षचिन्हावर लढले होते. मग पराभूत झालेल्यांची मते निवडणूक आयोगाने विचारात का घेतली नाही, असा सवाल करीत सीबीआय, ईडी, आयकर खाते याप्रमाणे निवडणूक आयोगही विकाऊ झाला असल्याची टीका त्यांनी केली.
पडळकरांवर टीका
- आ. गोपीचंद पडळकर हे तमासगीर आहेत. सत्तेत नसताना ते एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याची मागणी करत होते. त्यासाठी आंदोलने घडवली. आता पगार द्यायची सोय नाही, तर बोलायला तयार नाहीत, अशी टीकाही खा. सावंत यांनी केली.