निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावात; पोटनिवडणुकांवरून नाना पटोलेंची टीका
By मंगेश व्यवहारे | Published: December 14, 2023 11:11 AM2023-12-14T11:11:44+5:302023-12-14T11:12:55+5:30
लोकसभेच्या पोटनिवडणुका न घेण्यावरून नाना पटोलेंची टीका
नागपूर : निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावात काम करत असल्याचे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत. उच्च न्यायालयाने पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाला फटकारल्याने ही बाब स्पष्ट झाली आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना लगावला.
भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त राहिलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक तातडीने घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. तसेच गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. निर्धारित मुदतीमध्ये निवडणूक घेणे बंधनकारक आहे. मात्र, तसे होत नाही. त्यामुळे प्रशासक आणि सरकारच कारभार चालवित असून त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. प्रशासनाचे लक्ष नसल्याले राज्यात सर्वत्र डेंग्युचे रुग्ण वाढले आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
सरकारचा ओबीसीवर अन्याय
सरकार ओबीसीवर अन्याय करत असल्याचे स्वत: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सभागृहात म्हणाले आहेत. एकीकडे सरकार मराठ्यांना आरक्षण देणार, असे बोलत असतानाच भुजबळ ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू न देण्याची भूमिका मांडत आहे. या पद्धतीने ओबीसीविरुद्ध मराठा असा महाराष्ट्र पेटविण्यात आला आहे. यामागे भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.