लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. वर्षभरात कुठल्याची प्रकारची विकास कामे झालेली नाही. विधान परिषदेची निवडणूक व मनपा निवडणूक विचारात घेता काम करण्यासाठी आठ महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. त्यात दोन वर्षांचा विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. कार्यकाळाचे अंतिम वर्ष असून पुढील वर्षात महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. याचा विचार करता जनतेची कामे व्हावीत यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी दिली.
पदग्रहण समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दयाशंकर तिवारी यांनी शहर विकासाच्या प्रस्तावित योजनांची माहिती दिली. यावेळी उपमहापौर मनिषा धावडे, सत्तापक्षनेते संदीप जाधव, स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कोविड संसर्गाच्या कालावधीत मनपाच्या आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. याचा विचार करता व स्वातंत्याचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने नागरिकांना मनपाच्या रुग्णालयातून, आरोग्य केंद्रातून दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी. यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ७५ नवीन वंदेमातरम् आरोग्य केंद्र सुरू करून या केंद्रांना शौर्यपदक प्राप्त जवानांची नावे देण्याचा करण्याचा मानस दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला. मनपा शाळांंतील इयत्ता ८ वी तील ७५ विद्यार्थ्यांची निवड करून त्यातील प्रत्येकी २५ विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल व एनडीए अशा संस्थात प्रवेश मिळण्यासाठी तयार करण्याचा मानस तिवारी यांनी व्यक्त केला.
नव्या महापौरांनी व्यक्त केलेले संकल्प
-७५ नवीन वंदेमातरम् आरोग्य केंद्र
-७५ विद्यार्थ्यांना मेडिकल,इंजिनिअरिंग, एनडीए मध्ये प्रवेश मिळण्यासाठी प्रशिक्षण
-मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मिनरल वॉटर प्रकल्प
-स्मार्ट हॉकिंग झोन निर्माण करणार
-शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळण्यासाठी मनपात कक्ष स्थापन करणार
-माजी सैनिकांची मनपातील कामे व्हावी, यासाठी कक्षाची निर्मिती.
-मनपाची आथिर्क स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणार.
-नगररचना विभागात नकाशे तातडीने मंजुरीसाठी बैठक घेणार.
-नगरसेवकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आयुक्तांशी चर्चा करणार.