रात्री उशिरा दिली आकडेवारी : यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्हनागपूर : आॅनलाईन उमेदवारी व तक्रारीसाठी अॅप उपलब्ध करून अत्याधुनिक निवडणूक यंत्रणा कार्यान्वित केल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु दोन दिवसापूर्वी छाननी केल्यानंतरही सोमवारी रात्रीपर्यंत उमेदवारांची नावे निवडणूक विभागाकडे उपलब्ध नव्हती.छाननीत १५० जणांचे अर्ज अपात्र ठरले. परंतु अद्ययावत यंत्रणा असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तीन दिवसानंतरही त्यांची नावे जाहीर करणे शक्य झाले नाही. त्यामुळे चिन्ह वाटपानंतर १५०० उमेदवारांची नावे जाहीर करण्याला किती दिवस लागणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.नेमके कुणाचे अर्ज अपात्र ठरले व कोण पात्र ठरले, याबाबत शहरातील नागरिकांना उत्सुकता आहे. परंतु निवडणूक विभागाकडूनच याबाबतची माहिती उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना माहितीपासून वंचित राहावे लागत आहे. महापालिकेच्या १२ झोनमधून १८१० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु यात काही उमेदवारांनी दोन-तीन अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या कमी आहे. त्यातच यातील १७१ अर्ज अपात्र ठरल्याने नावांची यादी लहान झाली आहे. असे असूनही त्यांची नावे जाहीर करणे अद्यापही निवडणूक अधिकाऱ्यांना साध्य झाले नाही. अत्याधुनिक सुविधा असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून उमेदवारांच्या नावांबाबत गोपनीयता का बाळगली जात आहे की यंत्रणा सक्षम नाही, असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.(प्रतिनिधी)
निवडणूक विभागाकडे अपात्र उमेदवारांची नावे नाहीत?
By admin | Published: February 07, 2017 2:11 AM