लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच निवडणूक विभाग कामाला लागला आहे. यासाठी शहर व जिल्ह्यात ४० हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांची गरज भासणार आहे. यात महापालिकेतील १४०० कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा निवडणूक विभागाने महापालिका प्रशासनाला निवडणुकीत ड्युटी लावण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची यादी पाठविली आहे. यात सामान्य प्रशासन विभागासह सर्वच विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश आहे.मार्च महिन्यात मालमत्ता व नगर रचना विभागाकडून अधिक कर वसुली होते. यासाठी नियोजन केले जाते. परंतु निवडणुकीत ड्युटी लागल्याने मालमत्ता व नगर रचना विभागाच्या कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. याचा वसुलीवर परिणाम होणार आहे.मालमत्ता करापासून ५०९ क ोटींचे उत्पन्न गृहित धरले असले तरी प्रत्यक्षात २१५ ते २२० कोटीपर्यंत हा आकडा जाण्याची शक्यता आहे. सोपविण्यात आलेल्या निवडणूक जबाबदारीसंदर्भात कर्मचारी अधिकाऱ्यांच्या नावांनी निवडणूक विभागाने पत्र जारी केले आहे. अद्याप नियुक्ती झालेली नाही. परंतु महापालिका मुख्यालयातील सर्वच विभागात दोन दिवसापासून शुकशुकाट आहे. आचारसंहितेमुळे पदाधिकारी कार्यालयात येण्याचे टाळत असल्याने कर्मचाऱ्यांना धाक राहिलेला नाही.जिल्हा निवडणूक विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम मंगळवारी सामान्य प्रशासन विभागात सुरू होते. निवडणुकीच्या कामातून सुटका व्हावी, यासाठी काही कर्मचारी सामान्य प्रशासन विभागाकडे विचारणा करीत होते. मात्र ही प्रक्रिया जिल्हा प्रशासन राबवीत असल्याने महापालिका प्रशासनाला यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले.
मनपात शुकशुकाटलोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेत शुकशुकाट होता. पदाधिकाऱ्यांच्या कक्षातही वर्दळ नव्हती. निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत कामकाज जवळपास ठप्पच राहणार आहे.