लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २००० वर्षापूर्वी ग्रीकमध्ये लोकशाहीचा उदय झाला असे मानले जाते. त्या काळात तंत्रज्ञानाचा एवढा प्रभाव नव्हता, मात्र लोकशाहीची मूल्ये महत्त्वाची होती. आज मात्र लोकांना अपेक्षित असलेली लोकशाही जगात कुठेही दिसत नाही. निवडणूक प्रक्रिया आज केवळ एखाद्या पक्षाचा व त्यांच्या नेत्यांच्या प्रतिमा प्रचाराचा व्यवसाय झाला आहे. लोकांसाठी महत्त्वाचे असलेले मुद्दे सोडून स्वत:ची प्रतिमा उंचावण्यातच राजकारण्यांचा वेळ जातो. त्यासाठी तंत्रज्ञानाचा हवा तसा वापर व हवा तेवढा पैसा खर्च केला जातो. ही लोकशाहीची पडझड आहे. नवे तंत्रज्ञान लोकशाहीसाठी आव्हान ठरत असल्याचे मत बेलफिल्ड विद्यापीठ, जर्मनीचे तत्त्वज्ञ प्रा. लुडविग स्ट्रेईट यांनी व्यक्त केले.सेंट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट (सिरी) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शनासाठी आलेले प्रा. लुडविग यांनी लोकमतशी बोलताना आपले विचार व्यक्त केले. त्यांनी २००० ते २००१ या काळात विविध देशातील वर्तमान परिस्थितीच्या अभ्यासावरून आपले विचार मांडले. ‘कॉम्प्लेक्सीटी, अॅक्सेलरेशन, ग्लोबलायझेशन : चॅलेंजेस फॉर डेमोक्रसी’ हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. लोकशाहीचा उदय झाला तेव्हा प्रक्रिया हळुवार चालत होत्या. लोकांकडे वेळ होता. मात्र पुढे राष्ट्रांमधील तणाव वाढत गेला, युद्ध होत गेले व त्यातून तंत्रज्ञानाची गरज भासू लागली. नवनवे तंत्रज्ञान विकसित होत गेले. आज तंत्रज्ञानाने जग एकमेकांशी जुळले, मात्र यातून गुंतागुंत वाढीला लागली. जग प्रचंड गतिमान झाले असून कुणाकडे ही गुंतागुंत सोडविण्यासाठी वेळ नाही. सरकारचेही तसेच. आधी आर्थिक धोरण म्हणजे भविष्याची गुंतवणूक असायची. आज दर महिन्याला आर्थिक धोरणे बदलली जातात. यातून आर्थिक मंदीसारखे प्रश्न सातत्याने निर्माण होत आहेत. यालाच अॅक्सेलरेशन म्हणतात. त्यातून जगभरात समस्या निर्माण केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.लोकांचे सरकार हा आभास असल्यासारखे वाटते. लोकशाहीच्या देशातील लोक नाखूश आहेत, कारण ते योग्य पद्धतीने चालविली जात नाही. चीनमध्ये लोकशाही नाही, मात्र तो देश विकास करीत असून गरिबी कमी झाली आहे. सिंगापूरचा अनुभवही तसाच आहे. लोकांना हुकूमशाही ऐवजी लोकशाहीच महत्त्वाची वाटते, मात्र निवडणूक प्रक्रिया बदलावी असा विचार समोर येत आहे. त्यामुळे लोकशाही एक मोठा बदल घडण्याची वाट पाहतेय, असे वाटते. भविष्यात याचे परिणाम दिसतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
निवडणूक म्हणजे प्रतिमा प्रचाराचा व्यवसाय : लुडविग स्ट्रेईट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:41 PM
नवे तंत्रज्ञान लोकशाहीसाठी आव्हान ठरत असल्याचे मत बेलफिल्ड विद्यापीठ, जर्मनीचे तत्त्वज्ञ प्रा. लुडविग स्ट्रेईट यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्दे तंत्रज्ञान लोकशाहीसाठी आव्हान ठरत असल्याचे मत