नागपूर : हायकोर्टाच्या आदेशानंतर सहकार खाते बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्याच्या कामात गुंतले असून कळमेश्वर, काटोल, नरखेड बाजार समितीच्या प्रारंभिक याद्या सहकार विभागाच्या नागपूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लागल्या आहेत. २९ जुलैपर्यंत याद्यांमधील नावांवर आक्षेप मागविले आहेत तर ५ ऑगस्टला अंतिम यादी जाहीर होणार असून सहकार खात्याने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुका होणार आहेत.
याशिवाय कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कामठी व हिंगणा बाजार समित्यांमधील मतदार याद्या सहकार खात्याने मागविल्या आहेत. याद्यांची तपासणी सुरू असून पुढील आठवड्यात प्रकाशित होणार आहे. त्यानंतर आक्षेप आणि अंतिम यादी असे स्वरूप आहे. विघ्न न आल्यास सहाही बाजार समित्यांच्या निवडणुका वेळापत्रकानुसार होऊन नवीन कार्यकारिणीची निवड होणार आहे.
वास्तविक पाहता कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकारी निवडणुका टाळण्याच्या बाजूने आहेत. कार्यकारिणीच्या अधिन राहून काम करण्यास कुणीही अधिकारी तयार नाहीत. कार्यकारिणी बरखास्त झाल्याने अधिकारी मजेत आहेत. अधिकाऱ्यांनी विकास कामे ठप्प केल्याचा व्यापारी व आडतियांचा नेहमीच आरोप राहिला आहे. शिवाय अनेक प्रकारच्या भ्रष्टाचार फोफावला आहे. पण हायकोर्टाच्या आदेशामुळे आणि सहकार खात्याच्या निवडणूक कार्यक्रमांसमोर त्यांचे काहीही चालत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
२०१२ मध्ये झाल्या होत्या कळमना एपीएमसीच्या निवडणुका
कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २०१२ मध्ये झाली होती. त्यात पाच वर्षांसाठी कार्यकारिणी निवडून आली होती. त्यानंतर राज्य सरकारने प्रशासकाची नियुक्ती केली होती. यादरम्यान विकास कामे ठप्प राहिली. कळमना बाजार समितीवर अनेक राजकीय पक्षांची वर्चस्वाची लढाई सुरू आहे. ही समिती भ्रष्टाचारामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. वेगवेगळ्या मुद्यांवर अनेकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतरही निवडणुका होऊ शकल्या नाही. अखेर हायकोर्टाने सहा बाजार समित्यांमध्ये निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
हायकोर्टाच्या आदेशानंतरच निवडणुका
राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांवर ‘स्टे’ दिला होता, पण हायकोर्टाच्या आदेशानुसार कळमेश्वर, काटोल, नरखेड, नागपूर, कामठी आणि हिंगणा बाजार समितीच्या निवडणुका होणार आहेत. ऑक्टोबरपूर्वी निवडणुका घ्यायच्या आहेत. आदेशानुसार सहा बाजार समित्यांमधील मतदार याद्यांचे काम सुरू असून तपासणी करून कळमेश्वर, काटोल, नरखेड या तीन बाजार समितीची प्राथमिक मतदार यादी प्रकाशित केली आहे.
अजय कडू, उपनिबंधक, नागपूर जिल्हा सहकार विभाग.