लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव, वाढती रूग्णसंख्या, आरोग्य सुविधांवर पडणारा ताण व संक्रमणात होणारी वाढ यामुळे कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहे. याचा विचार करता महापालिका, नगर परिषदा, स्थायी समिती व विषय समित्यांचे सभापती, सदस्यांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत शासनाने पुढे ढकललेल्या आहेत. याबाबतचे आदेश गुरुवारी अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी काढले आहे. यामुळे महापालिकेच्या परिवहन सभापतींची निवडणूक लांबणीवर पडली आहे. विषय समितीच्या सदस्यांनाही प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मनपातील सत्तापक्षाच्या अंतर्गत वादात बाल्या बोरकर यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला आहे. यासाठी मनपातील एका वजनदार नेत्याने
समितीच्या प्रोसिडिंगची पाने गायब करून सोयीचा मजकूर लिहिला. असा आक्षेप समिती सदस्यांनी केला आहे. दुसरीकडे नवीन सभापतींची निवड अद्याप झालेली नाही. माजी सभापती बंटी कुकडे यांची या पदावर निवड केली जाणार आहे. मात्र शासन निर्देशानुसार पुढील आदेशापर्यंत विषय समित्यांना मुदतवाढ मिळाली आहे. यामुळे तूर्त काही दिवस बाल्या बोरकर हेच सभापती राहणार आहेत.
पुढील वर्षात मनपा निवडणूक आहे. अशा परिस्थितीत शासनाने तीन-चार महिने नवीन आदेश न काढल्यास बंटी कुकडे यांना पुन्हा सभापतिपदाची संधी मिळते की नाही, याची उत्सुकता लागली आहे.