नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीवर लक्ष ठेवून काही उपद्रवी मंडळी मुद्दामहून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. हे ध्यानात ठेवून परिस्थिती कशी हाताळायची, यासंबंधाने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण (इलेक्शन ट्रेनिंग) देण्यात आले आहे. उपद्रवींना वठणीवर आणण्यासाठी आणि कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी शहर पोलीस दल सज्ज आहे. त्यामुळे नागपुरात निवडणुका शांततेत पार पडेल, असा विश्वास पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केला. नागपुरात दिग्गज नेत्यांमध्ये लोकसभेची लढत होत आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या नागपुरात जाहीर सभा पार पडणार आहेत. त्यामुळे नागपूर पोलिसांचीही बंदोबस्ताच्या माध्यमातून कसोटी लागली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. उपाध्याय यांच्याशी लोकमतने बातचित केली.
निवडणुकीसाठी पोलिसांची काय तयारी?पोलिसांची अभूतपूर्व तयारी आहे. सहा हजार पोलीस, १००० अधिकारी, १५०० होमगार्डस् बंदोबस्तात तैनात आहेत. सीआयएसएफची एक तर एसआरपीएफच्या दोन कंपन्याही बंदोबस्तासाठी मदतीला आहेत. नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी विविध भागात फ्लॅग मार्च काढण्यात येत आहे. रात्रंदिवस पोलिसांची गस्त सुरू आहे.
मोठ्या नेत्यांच्या सभांचे दडपण राहील?देशातील मोठ्या नेत्यांच्या बंदोबस्ताचा विशेष प्रोटोकॉल असतो. ज्या नेत्यांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची सुरक्षा असते, अशा नेत्यांच्या सुरक्षा आणि सभांच्या बंदोबस्ताचे नियोजन ठरलेले आहे. विमानतळापासून ते ज्या ज्या ठिकाणी जातात, प्रचार सभा घेतात, त्या त्या मार्गावर, सभास्थळी, आजूबाजूच्या इमारतीवर पोलीस सुरक्षेचे कवच उभारण्यात येईल. आमची सर्व तयारी असल्याने प्रचार सभा, रोड शोचे फारसे दडपण वाटत नाही.
गुन्हेगारांचा बंदोबस्त कसा करणार?निवडणुकीदरम्यान जे असामाजिक तत्त्व गडबड करू शकतात, अशांची तसेच कुख्यात गुन्हेगारांची यादी तयार आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाईदेखील सुरू झाली आहे. आतापर्यंत ५०५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ३० जणांना तडीपार करण्यात आले. १२ जणांवर एमपीडीए लावून त्यांना कारागृहात डांबण्यात आले आहे. दोन टोळ्यांवर मोक्का लावण्यात आला आहे. प्रत्येक गुन्हेगारावर नजर असून, त्याने थोडीही गडबड केली तर त्याच्या मुसक्या बांधून त्याला आतमध्ये डांबण्यात येणार आहे.
निवडणुकांमध्ये दारूला उधाण येते...!होय, खरे आहे. गुन्हेगारीचे, भांडणाचे मूळच दारूत आहे. त्यामुळे शहरातील १२५ ठिकाणी नाकेबंदी करून संशयित व्यक्ती आणि वाहनांची झाडाझडती घेतली जात आहे. आतापर्यंत २५० दारू विक्रेत्यांवर कारवाई करून लाखोंची दारू जप्त करण्यात आली आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंत ५०० पेक्षा जास्त दारू विक्रेत्यांना जेरबंद करणार.
झोपडपट्ट्यांमध्ये चहलपहल वाढली...!संवेदनशील भाग आणि झोपडपट्ट्यांवर विशेष लक्ष आहे. झोपडपट्टीत जाऊन आमिष दाखवून किंवा धाक दाखवून मते प्रभावित करण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांना तातडीने अटक करण्यासाठी झोपडपट्टींमध्ये सर्चिंग, कोम्बिंग केले जात आहे. पाचपेक्षा जास्त मंडळी रात्री ९ नंतर कोणत्या झोपडपट्टीत शिरत असेल तर त्यांना ताबडतोब ताब्यात घेतले जाईल. संशय आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
पोलिसांच्या मनोबलाचे काय?पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी शहरातील पाचही परिमंडळातील सर्वच पोलीस ठाण्यांना मी प्रत्यक्ष भेटी दिल्या. ठाणेदार आणि तेथील कर्मचाऱ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला आहे. त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेत त्या तातडीने दूर करण्यात आल्या असून, सर्वच प्रकारची साधनसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पोलिसांचे मनोबल उंचावलेले आहे. कुणाच्याही दडपणात किंवा धाकात येण्याचा प्रश्नच नाही. वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कार्यकक्षेतील पोलीस ठाण्यातील स्थितीवर नजर ठेवून आहेत. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे.