जितेंद्र ढवळे/ राहुल पेटकर
रामटेक (नागपूर) : कट्टर शिवसैनिक कुणासोबतच हे निवडणुकीचे निकालच सांगतील, असा दावा उद्धव ठाकरे गटाचे नेते करीत आहेत. मात्र शिवसेनेचा गड असलेल्या रामटेक तालुक्यात निवडणूक होऊ घातलेल्या २८ ग्रामपंचायतींत यावेळी किती शिवसैनिक सरपंच होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेतील बंडानंतर रामटेकचे आ. ॲड. आशिष जयस्वाल हे एकनाथ शिंदे सोबत गेले. त्यामुळे रामटेक तालुक्यातील कट्टर शिवसैनिक ग्रा. पं. निवडणुकीत कुणाला साथ देतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.
मात्र रामटेकचा गड भेदण्यासाठी यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी दंड थोपटले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुळक यांची रामटेकची गाडी सुटली. मात्र यावेळी त्यांनी ग्रा. पं. निवडणुकीच्या माध्यमातून रामटेकचा गड सर करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
लोकसभा आणि विधानसभा आल्या की रामटेकमध्ये भूमिपुत्राचा नारा बुलंद होतो. त्यामुळे रामटेकचे भूमिपुत्र चंद्रपाल चौकसे आणि उदयसिंग यादव काँग्रेस समर्थित गटाचे सरपंच निवडून आणण्यात काय भूमिका वठवितात, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
रामटेकमध्ये भाजपचे संघटन मजबूत असल्याने माजी आ. डी. एम. रेड्डी हेही ग्रा. पं.साठी मोर्चेबांधणी करीत आहेत. येथे भाजपची खरी टक्कर शिवसेनेशी आहे. आदिवासी भागात गोंडवाना गणतंत्र पार्टीचे हरीश उईके हेही मैदानात उतरले आहेत.
तालुक्यात ७ ग्रामपंचायती राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्वाच्या आहेत. यात शीतलवाडी, खैरी बिजेवाडा, काचुरवाही, कांद्री, बोथीया पालोरा, वडंबा व उमरी या मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
कुणाची कुठे परीक्षा?
- काचुरवाही आ. जयस्वाल यांचे मूळगाव आहे. गत निवडणुकीत येथे प्रहार जनशक्ती पार्टीने विजय मिळविला होता. त्यामुळे यावेळी येथे सेनेचे जयस्वाल काय चमत्कार घडवितात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
- खैरी बिजेवाडा हे उदयसिंह यादव यांचे गाव आहे. गत निवडणुकीत येथे काँग्रेसला विजय मिळाला होता तर शीतलवाडी येथे शिवसेना विजयी झाली होती. या दोन्ही ग्रामपंचायती आपल्याकडे ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस शर्थीचे प्रयत्न करणार आहेत. पण येथे शिवसेनेचे दोन गट निवडणूक लढवणार आहेत. ही संधी काँग्रेस किती कॅश करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
- कांद्री ग्रामपंचायत शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे. या क्षेत्रातून शिवसेनेचे सदस्य संजय झाडे हे निवडून आले होते.
- आदिवासी भागातील बोथीया पालोरा, वडंबा, उमरी या भागात काँग्रेसची परीक्षा आहे. उमरी हे तालुका काँग्रेस अध्यक्ष कैलास राऊत यांचे मूळगाव आहे. पोटनिवडणुकीत येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे हरीश उईके विजयी झाले होते.
तालुक्यात कुणाची किती ताकद?
रामटेक तालुक्यात काँग्रेसचे दोन, शिवसेना, भाजपा व गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रत्येकी एक जि. प. सदस्य आहेत. पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे ४, शिवसेना (३) तर भाजपा आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीचा प्रत्येकी एक सदस्य आहे. यात शिवसेनेचे नेवारे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे सभापतिपद नरेंद्र बंधाटे यांच्याकडे आहे.
येथे होत आहे निवडणूक
तालुक्यात कट्टा, बांद्रा, वरघाट, डोंगरताल, खनोरा, पिपरीया, पिंडकापार लोधा, करवाही, शीतलवाडी, सोनेघाट, बोरी, लोहडोंगरी, काचुरवाही, सालई, बोरडा, महादुला, कांद्री, खैरी बिजेवाडा, भंडारबोडी, डोंगरी, मांद्री, पिंडकापार सोनपूर, नवरगाव, बेलदा, बोथीया पालोरा, वडंबा माल, उमरी चिचदा व हिवराबाजार येथे निवडणूक होत आहे.
६४,३२८ मतदार करणार फैसला
रामटेक तालुक्यात निवडणूक होऊ घातलेल्या २८ ग्रामपंचायतींमध्ये ९७ प्रभागांतून २७८ सदस्य व २८ सरपंचपदासाठी ६४,३२८ मतदार मतदान करतील. यात ३२,३६५ पुरुष तर ३१,९६३ महिला मतदारांचा समावेश आहे.