राकेश घानोडे, नागपूर: अकोला लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडणुकीविरुद्ध बार्शीटाकळी तालुक्यातील उमरदरी (पो. जनुना) येथील मतदार गोपाल चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. धोत्रे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व्यवहार केला. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी, असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराने त्याच्या निवडणुकीवर झालेल्या खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ७७ मध्ये तरतूद करण्यात आली आहे. तसेच, उमेदवाराने निवडणुकीवर किती खर्च करायचा, याची मर्यादाही निश्चित असते. गेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने ९५ लाख रुपये खर्चाची मर्यादा निर्धारित केली होती. परंतु, धोत्रे यांनी या कायद्याचे पालन केले नाही. त्यांनी खर्चाची मर्यादा ओलांडली व एकूण खर्चाची माहितीही लपवून ठेवली.
धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या खर्चाच्या माहितीमध्ये स्वत: ८१ लाख १७ हजार १०२ रुपये व भारतीय जनता पार्टीने ६ लाख ५५ हजार ८३० रुपये खर्च केल्याचे सांगितले आहे. हा एकूण खर्च ८७ लाख ७२ हजार ९३२ रुपये होतो. मात्र, भारतीय जनता पार्टीने धोत्रे यांच्या प्रचारासाठी प्रत्यक्षात १ कोटी २४ लाख ६० हजार ५९० रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. धोत्रे यांनी ही माहिती खर्चाच्या हिशेबात देणे आवश्यक होते, पण त्यांनी तसे केले नाही. त्यांनी ही माहिती दडवली. हा खर्च विचारात घेतल्यास त्यांनी खर्चाची मर्यादा ओलांडल्याचे स्पष्ट होते, असा दावा चव्हाण यांनी याचिकेत केला आहे. चव्हाणतर्फे ॲड. संदीप चोपडे कामकाज पाहणार आहेत.