नागपूर : पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे निवडणूक घेणे कठीण जाते. शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याने मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे सांगत सहकारी संस्थांच्या निवडणुका शासनाने पुढे ढकलल्या. मात्र, आता यातून नागपुरातील ‘दि मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लि.’चा निवडणुकीला वगळण्यात आले. या संस्थेची निवडणूक नियोजित दिवशी, ३ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेडिकलच्या परिसरातील बंगला क्र. ८, कोविड सेंटर होस्टेल क्र. १ च्या बाजूला होणार आहे.
राज्यात ३० जूननंतर पर्जन्यमानाचे स्वरूप जास्त असल्याने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती, पावसामुळे जनजीवन व वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता तसेच सदर परिस्थीती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी विचारात घेऊन, जास्तीत जास्त मतदारांना निवडणूकीमध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी महाराष्ट सहकारी संस्था अधिनियमानुकार राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचे शासनाने आदेश दिले होते. यावर ‘दि मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लि.’सह आणखी चार संस्थांनी सदर संस्थांचे सभासद हे शेतकरी नसून नोकरदार कर्मचारी असल्याचे व शेतीच्या कामाशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्याचे आणि मतदानापूर्वीची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याने निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे शासनाला निवेदन दिले. त्यावर शासनाने ३० जून रोजी आदेश काढून ‘दि मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लि.’ची निवडणूक पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार घेण्याला शासनाने मान्यता दिली.