नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी शुक्रवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर ६ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षकारांच्या विनंतीवरून ही तारीख दिली.
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी हे नागपूर मतदार संघातून विजयी झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी निवडणुकीच्या नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही. त्यांनी उत्पन्न लपवून ठेवले. उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांनी निवडणूक कायद्यातील विविध तरतुदी व नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करून नागपूर मतदार संघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे पटोले यांचे म्हणणे आहे.
गडकरी यांनी या याचिकेतील अनावश्यक व आधारहीन मुद्दे वगळण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सहाव्या ऑर्डरमधील नियम १६ अंतर्गत आणि ही याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारीज करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ (ए) अंतर्गत अर्ज दाखल केले आहेत. ते अर्जदेखील पुढील सुनावणीत विचारात घेतले जातील. पटोले यांच्यावतीने ॲड. सतीश उके तर, गडकरी यांच्यावतीने ॲड. देवेंद्र चव्हाण यांनी कामकाज पाहिले.
-------------------
तीन निवडणूक याचिका दाखल
लोकसभा निवडणुकीनंतर गडकरी यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात तीन निवडणूक याचिका दाखल झाल्या होत्या. त्यापैकी नाना पटोले व मतदार मो. नफिस खान यांची याचिका प्रलंबित आहे. वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दरम्यान, गडकरी यांनी खान यांची याचिका खारीज करण्यासाठी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८६(१) अंतर्गत अर्ज दाखल केला होता. तो अर्ज नामंजूर झाला.