धोत्रे, धानोरकर यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिका फेटाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 10:34 PM2019-12-16T22:34:54+5:302019-12-16T22:36:43+5:30
अकोला येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय धोत्रे व चंद्रपूर येथील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अकोला येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय धोत्रे व चंद्रपूर येथील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावल्या. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी सोमवारी हा निर्णय दिला. त्यामुळे दोन्ही खासदारांना मोठा दिलासा मिळाला.
मतदार ज्ञानेश्वर सुलताने यांनी धोत्रे तर, वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोले यांनी धानोरकर यांच्या निवडणुकीला आव्हान दिले होते. अकोला व चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आल्या. त्यामुळे झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान यात फरक आढळून आला. त्याचा फायदा विजयी उमेदवारांना मिळाला. तसेच, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे जारी करण्यात आलेल्या सूचनांचे व हॅन्डबुकमधील तरतुदींचे काटेकोर पालन केले नाही. परिणामी, दोन्ही मतदारसंघातील निवडणुका रद्द करून या ठिकाणी कायद्यानुसार नव्याने निवडणुका घेण्यात याव्यात असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.
याचिकाकर्त्यांच्या प्रत्युत्तरात दोन्ही खासदारांनी दिवाणी अर्ज दाखल करून याचिकांमधील दावे अमान्य केले. या याचिका दिवाणी प्रक्रिया संहितेतील आदेश ७ अंतर्गतच्या नियम ११ आणि लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील कलम ८१, ८३, १०० व १०१ मधील तरतुदीत बसत नाहीत. याचिकाकर्त्यांनी खासदारांविरुद्ध काहीही आरोप केले नाहीत. त्यांनी कोणते गैरकृत्य केले याचा उल्लेख याचिकांत नाही. या याचिका दाखल करण्याकरिता कोणतेही कारण घडले नाही. त्यामुळे याचिका खारीज करण्याची विनंती खासदारांनी केली होती. धानोरकर यांच्यातर्फे अॅड. अनिल ढवस, धोत्रे यांच्यातर्फे अॅड. मुग्धा व रोहण चांदुरकर तर, निवडणूक आयोगातर्फे अॅड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.