लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक आज (शुक्रवारी) होणार आहे. आजवर एकाही महिलेने उपाध्यक्षपद भूषविलेले नाही. मात्र, आता हे पद महिलेकडे जाणार असल्याचे संकेत असून सुमित्रा कुंभारे व शांता कुमरे यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु पुरुष सदस्याची वर्णी लागल्यास प्रकाश खापरे व दुधाराम सव्वालाखे यांची नावेही चर्चेत आहे.
आतापर्यंत उपाध्यक्षपदावर पुरुष सदस्यच विराजमान झाले आहेत. यंदा कॉंग्रेसकडून ही परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात येते. सत्ता पक्षनेतेपदी महिला सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांनी नियुक्ती करून कॉंग्रेसने नवा इतिहास घडविला. आता मिळणारे उपाध्यक्षपद हे केवळ काही महिन्यांसाठीच असेल. त्यामुळे शांता कुमरे फारशा उत्सुक नसल्याचे कळते. अखेर माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारेंच्या पत्नी सुमित्रा या पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. आरक्षण सोडतीनुसार यंदाचे अध्यक्षपदही महिलेकडे आहे. लेकुरवाळे गटनेत्या झाल्या आहेत. तसेच कृषी व पशुसंवर्धन समिती वगळता समाज कल्याण, महिला व बाल कल्याण आणि वित्त व शिक्षण समित्यावरसुद्धा महिलांकडेच आहे.
भाजपला पोटनिवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेत परत एकदा काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. ५८ पैकी ३२ सदस्य काँग्रेसचे आहेत. तर भाजपकडे केवळ १४ सदस्य आहेत. त्यामुळे उपाध्यक्षपदासाठीची निवडणूक ही निव्वळ औपचारिकता आहे. त्यामुळे भाजप निवडणूक लढणार की माघार घेणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.