लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी शनिवारी नागपूर महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीला ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल व माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख उपस्थित नव्हते. दोन्ही प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीत मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना ताकद कशी मिळेल, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. (In the Absence of Patel and Deshmukh, Supriya Sule took review of election)
गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात शनिवारी आयोजित बैठकीत शहर व जिल्हा राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांशी सुप्रिया सुळे यांनी वेगवेगळी चर्चा केली. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आपल्या मंत्र्यांची फौज मैदानात उतरविणार आहे. दर १५ दिवसांनी राष्ट्रवादीचे मंत्री नागपुरात दाखल होतील. पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतील, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. सोबतच ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ उपक्रम राबवा, लोकांच्या समस्या सोडवा, जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करा, असे निर्देश दिले.
यावेळी राष्ट्रवादीचे संपर्क प्रमुख माजी आमदार राजेंद्र जैन, माजी मंत्री रमेश बंग, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, ग्रामीण अध्यक्ष शिवराज गुजर, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे, माजी आमदार विजय घोरमाडे, दीनानाथ पडोळे, वेदप्रकाश आर्य, नगरसेविका आभा पांडे, शहर महिला अध्यक्षा लक्ष्मी सावरकर, जिल्हा महिला अध्यक्षा अर्चना हरडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
...तर राष्ट्रवादी स्वबळावर लढेल : पेठे
- मनपा निवडणुकीत मागणीनुसार काँग्रेसने जागा दिल्या नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा इशारा दुनेश्वर पेठे यांनी दिला.
खा. सुळे म्हणाल्या..
- गंगा-जमुना हा विषय अतिशय संवेदनशील आहे. मी त्यावर माहिती घेईन. दाेन्ही बाजू ऐकून प्रशासनाचेही म्हणणे ऐकून घेऊ.
- कोविडकाळात नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे.
- नागपूर मेट्रोमध्ये आरक्षण डावलून पदभरतीजप चौकशी व्हायला काही हरकत नाही. चौकशी मागणे हा अधिकार आहे.