लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान गेल्या १९ एप्रिल रोजी पार पडले. निवडणूक प्रक्रीया यशस्वी करण्यासाठी कर्मचारी रात्रंदिवस राबले. परंतु, त्यापैकीच अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांनाच मतदानापासून वंचित राहावे लागल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये मतदानाच्या टक्केवारीवरून विविध संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच अनेक नागरिकांनी नावे मतदार यादीत नसल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली होती. तो विषय तापलेला असताना मतदान प्रक्रीया राबविणारे कर्मचारी मतदानापासून वंचित असल्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. रामटेक व नागपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या असंख्य कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर केल्यानंतरही इडीसी उपलब्ध झाल्याने मतदानाचा हक्क बजावता आला नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाने वेळीच आवश्यक खबरदारी घेणे आपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले. त्यामुळे निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मतमोजणीपूर्वीच पोस्टल बॅलेट उपलब्ध करून मतदानाची संधी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राजय जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार प्रणित)ने जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे निवेदनातून केली. यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद अंतुरकर, मार्गदर्शक सुदाम पांगुळ, मुख्य मार्गदर्शक संजय सिंग यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.