नागपूर : जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द झाल्याने या निवडणुकांच्या तयारीसाठी शासकीय यंत्रणे घेतलेले परिश्रम आणि निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. निवडणुका रद्द झाल्याचे अधिकृत आदेश प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.राज्य शासनाने केलेल्या विनंतीनुसार आयोगाने राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या मुदतपूर्व होणाऱ्या निवडणुका रद्द केल्या आहेत. त्यात नागपूर जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारी महिन्यात ग्राम पंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला होता. एप्रिल महिन्यात ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत होती त्या ग्रामंपचायतींसोबपतच ज्याची मुदत आॅगस्टमध्ये संपणार होती त्याही ग्रामपंचायीतंच्या निवडणुका सोबतच घेण्यात येणार होत्या. त्यात जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींचा समावेश होता. या ग्रामपंचायतींची मुदत ही आॅगस्ट/ सप्टेबर या दरम्यान संपणार होती. दरम्यान मुदतपूर्व निवडणुका घेण्यास काही आमदारांनी विरोध केला होता. त्याची दखल घेत शासनाने आयोगाला याबाबत विनंती केली होती. त्यानुसार आयोगाने ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपायची आहे अशा ठिकाणच्या रद्द केल्या . त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही रद्द झाल्या. आता त्या जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे.दरम्यान निवडणुका होणार म्हणून जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यापासून तयारीला सुरुवात केली होती. सुरुवातीला ज्या गावात या निवडणुका होणार होत्या तेथील प्रभागांचे सीमांकन करण्यात आले. त्यावर आक्षेप मागवण्यात आले व त्यावर सुनावणी सुद्धा घेण्यात आली होती. त्यानंतर मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्या होत्या. मतदार केंद्र निश्चित करण्यापर्यंतची तयारी निवडणूक यंत्रणेने सुुरू केली होती.दुसरीकडे निवडणुका लढवण्यास इच्छुक असणाऱ्या प्रतिनिधींनीही त्याची तयारी सुरू केली होती. जिल्ह्यातील १३ तालुक्यात या निवडणुका होणार असल्याने संबंधित भागातील आमदार आणि माजी आमदारांनी त्यांच्या प्रभावक्षेत्रातील ग्रामपंचायतींवर प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. राखीव जागेवर निवडणुका लढविण्यासाठी जात प्रमाणपत्र तयार करणे सुरू झाले होते. मतदारांशी संपर्क वाढविणे, मोर्चेबांधणी आदी प्रकार सुरू झाले होते. निवडणूक रद्द झाल्याचे आदेश आल्याने सर्वांच्या उत्साहावर पाणी पेरल्या गेले. (प्रतिनिधी)
निवडणुका रद्द; उत्साहावर पाणी
By admin | Published: April 01, 2015 2:38 AM