नागपूर : राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबररोजी मतदान होणार आहेत. यापैकी विदर्भातील तब्बल ३६५ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचा फड रंगणार आहे. विशेष म्हणजे विदर्भात नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३६५ त्यापाठोपाठ भंडारा- गोंदिया मिळून ६० ग्रा.पं.च्या निवडणुका आहेत. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे त्यांच्या गृहजिल्ह्यात किती वजन आहे याचे मोजमाप या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे याचा नागपूर हा गृहजिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील लढतींवर राज्याचे लक्ष राहणार आहे. नागपूर पाठोपाठ भंडारा जिल्ह्यातील ६६ व गोंदिया जिल्ह्यातील ४ ग्रा.पं.च्या निवडणुका आहेत. हे दोन्ही जिल्हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कर्मभूमी आहे. त्यामुळे आपले जिल्हे बहुमताने राखण्यासाठी या दोन्ही प्रदेशाध्यक्षांना पुढील काही दिवस गृहजिल्ह्यात तंबू ठोकावा लागणार आहे.
१६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. ५ नोव्हेंबर रोजी मतदान होऊन ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. मंगळवारी निवडणुकीची घोषणा होताच राजकीय नेते सक्रिय झाले असून आठवडाभरात उमेदवारांची चाचपणी करून नावे निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा - ग्रा.प. संख्या
- अमरावती - २०
- अकोला - १४
- यवतमाळ - ३७
- बुलडाणा - ४८
- वाशिम - ०२
- नागपूर - ३६५
- वर्धा - २९
- चंद्रपूर - ०८
- भंडारा - ६६
- गोंदिया - ०४
- गडचिरोली - ३९
- एकूण - ६३२