कमलेश वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एखादी निवडणूक हरली की अनेकजण मनात रोष धरून ठेवतात, पण भाजपचे माजी आ. सुधाकर कोहळे व काँग्रेसचे बंटी शेळके यांनी मनाचा मोठेपणा दाखविला. ज्यांच्या विरोधात निवडणूक हरले त्यांच्याच घरी पोहोचत अभिनंदन केले. शेळके यांनी हार घालून आ. प्रवीण दटके यांचे स्वागत केले, तर कोहळे यांनी आ. ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांना पेढा भरवत विजयासाठी अभिनंदन केले.
मध्य नागपुरातील निवडणुकीत प्रवीण दटके व बंटी शेळके यांच्या समर्थकांतील वादांमुळे चांगलीच गाजली. एक-दोन प्रसंगांमुळे तणावही निर्माण झाला. मतदानाच्या दिवशी दोन गटांत हाणामारी होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दोन युवा नेत्यांमधील हे राजकीय वैमनस्य पुढे कायम राहील, अशी चर्चा रंगू लागली होती. पण, शनिवारच्या निकालानंतर रविवारी बंटी शेळके यांनी दटके यांची भेट घेतली. शाल व हार घालून त्यांचे स्वागत केले. स्वतःच्या हाताने पेढा भरविला व पाया पडून त्यांचे आशीर्वादही घेतले. शेळके यांनी दटके यांच्या सर्व समर्थकांचीही गळाभेट घेतली. हा प्रसंगी उपस्थितांना भावुक करणारा ठरला.
पश्चिम नागपुरातील जाहीर सभेत भाजपचे उमेदवार माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी आ. विकास ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे कोहळे यांच्याबाबत ठाकरे समर्थकांमध्ये कटुता निर्माण झाली होती. पण, निकालानंतर रविवारी कोहळे हे आ. विकास ठाकरे यांच्या घरी पोहोचले. त्यांनी बुके देऊन ठाकरे यांचे स्वागत केले. पेढा भरविला व गळाभेट घेतली. यावेळी ठाकरे कुटुंबीयांनीही त्यांचे स्वागत केले. या प्रसंगामुळे प्रचारातील कटुता क्षणात विरल्याचे पाहायला मिळाले. शेळके व कोहळे या दोन्ही नेत्यांनी आपल्या कृतीतून राजकीय आदर्श घालून दिला. ते हरले पण, त्यांनी अनेकांची मनं जिंकली.