नागपूर : मेट्रोचा प्रवास सुलभ होण्यासाठी महामेट्रो, मनपा आणि मिहान इंडिया लिमिटेडच्या संयुक्त विद्यमानाने एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळादरम्यान मनपाच्या दोन वातानुकूलित इलेक्ट्रिक शटल बस सेवा २ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. बसची आसन क्षमता ४५ असून भाडे १२ रुपये राहील.
ही सेवा सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत एअरपोर्ट मेट्रो स्टेशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळदरम्यान दर १५ मिनिटांनी उपलब्ध राहील. विमानतळाहून मेट्रो स्टेशनकडे येताना किंवा मेट्रो स्टेशनवरून विमानतळाकडे जाताना प्रवाशांसोबत सामान असते. त्यामुळे त्यांना अंतर कापणे कठीण होते. सेवा सुरू झाल्यानंतर त्यांचा प्रवास सुकर होईल.
या सेवेमुळे पावसाळा आणि उन्हाळ्यात प्रवाशांची सोय होईल. मेट्रो सेवा अखेरच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे. विमानतळ ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशनदरम्यान शटल बस सेवा सुरू करण्याची नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. त्याचाच एक भाग म्हणून फिडर सेवा सुरू करण्यात येणार आहे.