नागपूर : सुविधा, संसाधने असतील तरच यश मिळते, हा समज नागपूरच्या भाग्यश्री नयकाळे या जिद्दी मुलीने फोल ठरविला. वडील इलेक्ट्रिशियनची कामे करतात. त्यामुळे तयारीसाठी महागड्या सुविधांसाठी आर्थिक पाठबळ नव्हतेच; पण भाग्यश्री यांनी हार न मानता स्वतःच तयारी करीत यूपीएससीच्या यशाला गवसणी घातली. भाग्यश्री नयकाळे यांनी यूपीएससीमध्ये ७३७ ची रैंक प्राप्त केली आहे. ओबीसी प्रवर्गातून असल्याने आयपीएस किंवा आयआरएस मिळेल, असा विश्वास त्यांना आहे. कुटुंबाला व विशेषतः आईला हा आनंदाचा क्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. वडील राजेश नयकाळे हे इलेक्ट्रिशियनची कामे करतात. कोविडपूर्वी वडिलांना राजस्थानच्या जयपूर येथे इलेक्ट्रिक कामाचे कंत्राट मिळाले, तेव्हा कुटुंबाला सोबत जावे लागले. या काळात राजस्थानच्या महाविद्यालयातून बी.एस्सी पदवी पूर्ण केली. कोविड काळात काम सुटल्याने कुटुंबाला नागपूरला परतावे लागले.
२०२१ साली पदवी पूर्ण केल्यानंतर भाग्यश्री यांनी लगेच यूपीएससीची तयारी सुरू केली. कुणी मार्गदर्शक नव्हता, त्यांनी तयारी सुरू केली. स्वतःच मागील परीक्षांचे प्रश्नसंच काढले. त्यावरून अभ्यास सुरू केला. पहिल्या वर्षी सहज परीक्षा दिली; पण नंतर पूर्ण गंभीरपणे तयारी सुरू केली. कोचिंग मिळणे अशक्य होते. मात्र, ऑनलाइन साहित्याचा लाभ झाल्याचे त्या सांगतात. रोजचे १० ते १२ तास त्यासाठी मेहनत घेतली. शेवटी तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवले.