लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना निर्बंधांमुळे सर्वत्र लॉकडाऊन असून 'वर्क फ्रॉम होम' आणि तापमानाचा वाढता पारा यामुळे घरगुती वीजग्राहकांच्या वीजवापरात वाढ होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत महावितरणकडून मीटर रीडिंग घेण्यात येत असले, तरी ग्राहकांनीही आपले मीटर रीडिंग तपासून ते महावितरणकडे पाठविल्यास ग्राहकांना आपल्या वीजवापरावर नियंत्रण आणता येईल तसेच अचूक बिलासाठीही या मीटर रीडिंगचा वापर होईल. मीटर रीडिंग घेताना ग्राहकांना कुठलीही अडचण आल्यास त्याचे निराकरण त्वरित व्हावे, यासाठी नागपूर परिमंडळाने ग्राहकांसाठी व्हाॅट्सॲप क्रमांक जाहीर केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी महावितरणचे कर्मचारी कोरोना नियमांचे पालन करून ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांकडून कंटेनमेंट भाग वगळता इतर सर्व ठिकाणी वीजमीटरचे रीडिंग घेणे सुरूच आहे. परंतु, तरीही कोरोनाकाळात अचूक बिलासाठी रीडिंगबाबत एसएमएस मिळाल्यानंतर ग्राहकांनीही वीजमीटरचे मीटर रीडिंग पाठविल्यास ग्राहकांना वीजवापरानुसार अचूक वीजबिल मिळण्यास आणखी मोठी मदत मिळणार आहे. वीजमीटरचे मीटर रीडिंग पाठविताना ग्राहकांना अडचण आल्यास ती सोडविण्यासाठी नागपूर परिमंडळाने नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीसह बुटीबोरी, हिंगणा तालुक्यातील वीजग्राहकांसाठी ७८७५०१००५२ हा व्हॉट्सॲप क्रमांक ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला असून नागपूर जिल्ह्यातील उर्वरित ग्रामीण भागासाठी ७८७५७६६६९१ हा क्रमांक महावितरणकडून वीजग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्राहकांनी आपल्या मोबाइलवरून या क्रमांकावर मेसेज पाठविल्यास महावितरणच्या वतीने ग्राहकांना मीटर रीडिंग कसे पाठवावे, याबाबतची माहिती व व्हिडीओ शेअर करण्यात येणार आहे.