- महावितरणच्या मोहिमेने पकडली गती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीर्घ काळापासून वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचे विद्युत कनेक्शन कापण्याच्या मोहिमेला महावितरणने गती दिली आहे. याच शृंखलेत नंदनवन, बिनाकी व तुळशीबाग उपविभागात अनेक ग्राहकांची वीज कापण्यात आली आहे.
महावितरणकडून प्राप्त माहितीनुसार नंदनवन उपविभागाने पोलीस बंदोबस्तात गायत्रीनगर, जगनाडे चौक परिसरातील ग्राहकांचे कनेक्शन कापले. २८ ग्राहकांचे विजबिल १९.५१ लाख रुपये पेंडिंग असल्याने, त्यांचे कनेक्शन नेहमीसाठी कापण्यात आले आहे. मोहिमेदरम्यान सहा ग्राहकांनी एकूण १.३८ लाख रुपये बिल तत्काळ भरून कारवाईपासून स्वत:चा बचाव केला. बिनाकी उपविभागात ठक्करग्राम व खैरीपुरा येथे पोलिसांच्या सहयोगाने कारवाई करण्यात आली. ११.५८ लाख रुपये बिल पेंडिंग असल्याने १२ ग्राहकांचे कनेक्शन कापण्यात आले. १० ग्राहकांनी तत्काळ बिल भरत कारवाईपासून बचाव केला. महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन जायसवाल, प्रशांत भाजीपाले, अशोक ओझा यांनी ही कारवाई केली.
आकोडे टाकून वीजचोरी
कारवाई दरम्यान २४ ठिकाणी आकोडे टाकून अवैध स्वरूपात वीज घेणाऱ्यांचे प्रकरणही पुढे आले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. तुळशीबाग उपविभागअंतर्गत सोनिया गांधी झोपडपट्टी, तुळशीबाग, भालदारपुरा परिसरात आठ ठिकाणी विजेची चोरी पकडण्यात आली. अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसन्न श्रीवास्तव यांच्या नेतृत्त्वात झालेल्या या कारवाईने परिसरात गोंधळ उडाला होता.
...........