नागपूर : मंगळवारी रात्री पारेषण यंत्रणेत आलेल्या तांत्रिक त्रुटीमुळे अर्ध्या नागपूरसह रामटेक, भंडारापर्यंत वीजपुरवठा प्रभावित झाला. अचानक १६० मेगावॅट वीजपुरवठा ठप्प झाला; परंतु महापारेषणने अवघ्या तासाभरात ही मोठी तांत्रिक त्रुटी दूर करीत नागरिकांना दिलासा दिला.
महापारेषणचे प्रभारी मुख्य अभियंता सतीश अणे यांनी सांगितले, खापरखेडा येथील उपकेंद्राचे कंडक्टर वाढती विजेची मागणी व उन्हामुळे वितळून पडले. रात्री जवळपास ११.०२ वाजता झालेल्या या तांत्रिक गडबडीमुळे २२० केव्ही खापरखेडा-कन्हान लाईन जवळपास ११.३० वाजता ट्रिप झाली. बेसा व पारडी सब स्टेशन ठप्प झाले. बेसा, मानेवाडा, नरेंद्रनगर, धंतोली, छत्रपतीनगर, लष्करीबागसह दक्षिण, मध्य व पूर्व नागपुरातील मोठ्या भागातील वीजपुरवठा ठप्प झाला.
प्रभारी मुख्य अभियंता अणे यांच्या मार्गदर्शनात कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रिया मोडक, कोकाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने थर्मो स्कॅनिंग तंत्रज्ञानाने तपासणी सुरू केली. कंडक्टर दुरुस्त करून रात्री १२ वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. एकेक करीत फीडर सुरू केले. भंडारा जिल्ह्यातील वीजपुरवठा रात्री एक वाजताच्या जवळपास सुरू होऊ शकला. दुसरीकडे महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता अमित परांजपे व अविनाश सहारे हे वीज वितरण यंत्रणा व्यवस्थित ठेवण्याच्या कामी लागले होते.
नागपूरची मागणी ६०० मेगावॅटपेक्षा अधिक
नागपूरची विजेची मागणी दरवर्षी १०० मेगावॅटने वाढत आहे. कोविड संक्रमणकाळापूर्वी उन्हाळ्यात जिल्ह्याची मागणी ४०० मेगावॅट होती. ती आता ६०० मेगावॅटपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे पारेषण व वितरण यंत्रणेवर भार वाढला आहे. शहरात १३३ केव्हीच्या ७ सब-स्टेशनच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जात आहे. यात पारडी, बेसा, उप्पलवाडी हिंगणा १-२, मानकापूर व खापरी सब स्टेशनचा समावेश आहे. मंगळवारी बेसा व पारडी सब स्टेशन बंद झाले होते.