लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : काेविड-१९ महामारीच्या काळात वीज ग्राहकांच्या देयकांची वसुली रखडली. परिणामी महावितरणची ग्राहकांवरील थकबाकी प्रचंड वाढली आहे. यासाठी सावनेर विभागातील गावागावांत वीज तक्रार निवारण मेळावा उपक्रम राबविण्यात आला. कार्यकारी अभियंता कुलदीपक भस्मे यांनी वीज देयकाबाबत तक्रारी व ग्राहकांच्या शंकांचे निराकरण केले.
सावनेर विभागांतर्गत खापरखेडा, कळमेश्वर, सावनेर, पारशिवनी, मोहपा आणि खापा परिसरातील गावांमध्ये आयाेजित मेळाव्यात वीज ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. शासनाच्या काेविड-१९ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार उच्चदाब लघुदाब (अकृषक) आणि कृषी ग्राहकांना वीज देयके भरण्यास प्राेत्साहित करणे, वसुलीसाठी उपविभाग विभाग आणि मंडळ कार्यालयाची जबाबदारी निश्चित करण्यास परिपत्रक काढून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.
कार्यकारी अभियंता कुलदीपक भस्मे यांनी वीज ग्राहकांना वीज देयके भरण्यास प्रवृत्त करण्याची माेहीम सुरू केली. विभागांतर्गत असलेल्या सर्व उपविभागांना तसे आदेश दिले. या उपक्रमात मेळाव्याचे आयोजन करणे, ग्राहकांना गरज असल्यास थकबाकीचे सुलभ हप्त्याची सुविधा देणे, लाेकप्रतिनिधींची भेट घेऊन ग्राहकांना आवाहन करण्याची विनंती करणे, तसेच सामाजिक माध्यमातून ग्राहकांना आवाहन करणे, आदी कामे सुरू केली आहेत. उपक्रमांतर्गत आयाेजित मेळाव्यात १४,८४४ ग्राहकांनी तक्रारी नाेंदविल्या. यापैकी १४,६९९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. याबाबत वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.