नागपूर : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरचे फुलझरी गाव मागील कितीतरी वर्षापासून श्वापदांचे भय मनात ठेवून जगत आहे. जंगलव्याप्त असलेल्या या गावामध्ये वीज वितरण कंपनीची वीज तर पोहचली नाहीच, पण सौर ऊर्जेच्या माध्यमातून या गावकऱ्यांना वीज उपलब्ध करून द्यावेसेही अधिकाऱ्यांना वाटले नाही. परिणामत: सायंकाळ झाली की स्वत:ला घरात अंधारात कोंडून घेण्याशिवाय या गावकऱ्यांपुढे अन्य पर्याय उरलेला नाही.
रामटेक तालुक्यातील फुलझरी हे गाव तालुका मुख्यालयापासून ३६ किलोमीटर अंतारावर आहे. १०० टक्के आदिवासीबहुल असलेल्या सुमारे ३०० लोकवस्तीच्या या गावामध्ये ४० ते ५० घरे आहेत. पेंच प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या या गावात पोहचण्यासाठी धड रस्ताही नाही. वनव्याप्त गाव असल्याने कसल्याही सुविधा गावात पोहचल्या नाहीत. नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या या गावात वन कायद्याचा अडसर आल्याने कसल्याही सुविधा नाहीत. सायंकाळ झाली की श्वापदे गावात येतात. कधी धोका होईल सांगता येत नाही. त्यामुळे गावकरी अक्षरश: स्वत:ला रात्रभर घरात कोंडून घेतात.
या गावाच्या समस्यांसंदर्भात मनसेचे रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुडे म्हणाले, या गावकऱ्यांकडे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड आहे. मतदानाला नेतेमंडळी गावात पोहचतात, मात्र सुविधांकडे लक्ष कुणाचेच नाही. वीज वितरण कंपनीकडे बरेचदा गावकऱ्यांसह निवेदने दिली. मात्र हा प्रश्न वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पोहचलाच नाही. परिणामत: बफर झोनमधील अन्य गावात वीज पोहचूनही हे गाव मात्र वीज कंपनीच्या यादीवर आलेच नाही. दोन दिवसापूर्वी दुडे यांच्या पुढाकारात गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पुन्हा निवेदन देऊन गावात किमान सौर ऊर्जेवरील प्रकाशाची तरी व्यवस्था करा, अशी मागणी करणारे निवेदन दिले आहे.
...
वन विभागाला करायचे आहे पुनर्वसन
हे गाव पेंचच्या बफर झोनमध्ये येत असल्याने वन विभागाला या गावाचे पुनर्वसन करायचे आहे. मात्र गावकऱ्यांचा याला विरोध आहे. गावालगत आपली शेती आहे. वन विभाग फक्त १० लाख रुपयाची नुकसान भरपाई देऊ पाहत आहे. त्यामुळे गाव सोडून जाण्यास गावकऱ्यांचा नकार आहे. या संघर्षात हे गावकरी सुविधांपासून दूर राहिले आहेत.
...