नागपूर : महावितरणतर्फे वीज दर वाढविण्याची तयारी केली जात आहे. परंतु राज्य सरकार सर्वसामान्य नागरिकांवर वीज बिलाचा बोजा पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले. यासंदर्भात शुक्रवारी मुंबईत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केल्याची माहितीही त्यांनी दिली.
प्रेस क्लब येथे गुरुवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करतांना ते बोलत होते. राऊत म्हणाले की, एप्रिल २०२० पासून राज्यात लागू होणाºया वीज दराबाबत राज्य वीज नियामक आयोगासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे. निर्णय आयोगाला घ्यायचा आहे. त्यानंतरच वास्तविक चित्र स्पष्ट होईल. सध्या सामान्य नागरिकांवर या दरवाढीचा बोजा पडू नये, असा सरकारचा प्रयत्न राहील. त्यासाठी बैठक आयोजित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऊर्जा विभाग स्कॅनरवर, राजीनामा न देणारे होणार निलंबितवीज कंपन्यांमध्ये मागच्या सरकारतर्फे मानद पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेच्या लोकांप्रति ऊर्जामंत्री राऊत यांनी कडक भूमिका घेतली आहे. तेथील सर्वजण स्कॅनरवर आहेत. त्यांनी सांगितले की, सर्व लोकांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. परंतु जे राजीनामा देणार नाहीत, त्यांना हटविण्यात येईल. सेवानिवृत्तीपूर्वी सुटीवर पाठवण्यात आलेले वादग्रस्त अधिकारी संदेश हाके यांची होल्डिंग कंपनीत नियुक्तीच्या प्रश्नावर राऊत यांनी ऊर्जा विभाग स्कॅनरवर असल्याचे स्पष्ट केले.